महाबोधी विहाराचे व्यवस्थापन पूर्णतः बौध्दाच्या ताब्यात द्या - रामदास आठवले
◻️“बुध्द धम्म हा मनःशांतीतून विश्वशांतीकडे नेणारा आदर्श मार्ग”
संगमनेर LIVE (बुध्दगया, बिहार) | भगवान गौतम बुध्दांनी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेला बौध्द धम्म हा केवळ धर्म नसून मनःशांतीतून विश्वशांतीकडे नेणारा एक आदर्श जीवनमार्ग आहे. बौध्द धम्म हे खऱ्या अर्थाने विश्वशांतीचे प्रतीक आहे.” असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले.
बिहार राज्यातील बुध्दगया येथील जागतिक सर्वोच्च श्रध्दास्थान असलेल्या महाबोधी महाविहार येथील पवित्र बोधीवृक्षाखाली आयोजित ‘जागतिक बौध्द भिक्खू संमेलनात’ ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. या संमेलनाचे आयोजन भंते हर्षबोधी यांनी केले होते.
याप्रसंगी बोलताना नामदार आठवले यांनी नमूद केले की, या ऐतिहासिक संमेलनास भारत, नेपाळ, श्रीलंका, जपान, तैवान, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, मलेशिया, सिंगापूर, तिबेट आणि थायलंड यांसारख्या विविध देशांतील बौध्द भिक्खूंची उपस्थिती हा एक वैश्वीक ऐक्याचा संदेश आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौध्द धम्म हा मानवतावादी, विज्ञानवादी आणि न्यायावर आधारित असल्यानेच त्यांनी भारतात धम्मचक्राचे पुनरुज्जीवन केले. महाबोधी महाविहार हे बौध्दाचे सर्वोच्च श्रध्दास्थान असल्याने त्याचे संपूर्ण व्यवस्थापन पूर्णतः बौध्दाच्या ताब्यात असायला हवे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
महाविहार विश्वस्त ट्रस्टचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य बौध्द असावेत, या मागणीसाठी आपण यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, उद्या पुन्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन या प्रश्नाचा पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान बौध्द संमेलनापूर्वी नामदार रामदास आठवले यांनी महाबोधी महाविहार येथे जाऊन भगवान बुध्दाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भगवान बुध्दाच्या अत्यंत पवित्र अशा ‘अस्थिकलशाचे’ शिरसावंद्य दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आहेत.