आश्वी महाविद्यालयाच्या तीन दिवसीय योग कार्यशाळेचे उध्दघाटन
◻️ राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत पिंप्री-लौकी अजमपुर येथे प्रत्यक्षिकांचे सादरीकरण
संगमनेर LIVE | प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आश्वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व बीसीएस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पिंप्री-लौकी अजमपुर येथे तीन दिवसीय योग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी या कार्यशाळेचे उध्दघाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव लावरे उपस्थित होते.
याप्रसंगी योगतज्ज्ञ संभाजी देवकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व सविस्तरपणे विशद केले. धावपळीच्या युगात शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी योग हा एकमेव मार्ग असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी विविध योगासनांची लघुप्रत्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
तत्पूर्वी, महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास दाभाडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे ग्रामीण भागात आणि विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत मोठी जागरूकता निर्माण होते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमात शुभेच्छा देताना माजी प्राचार्य भास्करराव पाटोळे यांनी, विद्यार्थ्यानी अशा आरोग्यवर्धक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन आपले जीवन सुदृढ आणि आनंदमय बनवावे असे आवाहन केले. डॉ. आदिनाथ घोलप यांनी पुढील तीन दिवसांच्या नियोजित कार्यक्रम पत्रिकेचे वाचन केले. या कार्यशाळेत आगामी काळात प्राणायाम, ध्यानधारणा आणि विविध आसनांचे सविस्तर प्रशिक्षण व तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राजेश्वरी पाबळ व प्रीतम भुसाळ यांनी केले, तर उपस्थिताचे आभार रासेयो चे सह समन्वयक प्रा. गणेश खेमनर यांनी मानले. याप्रसंगी डॉ. सुवर्णा घोलप, डॉ. सोमनाथ भुमकर, डॉ. सारिका रोहमारी, प्रा. मिनीनाथ औताडे, रामदास ताजणे, राजू पिंजारी यांच्यासह पिंप्री-लौकी अजमपुर येथील ग्रामस्थ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.