आमदार खताळामुळे राजापूर वीज उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवली!
◻️ राजापूर सह गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रावर वाढत्या भारामुळे निर्माण झालेली विजेची समस्या आता कायमस्वरूपी सुटण्याच्या मार्गावर आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष सूचनेनुसार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महावितरण प्रशासनाने या उपकेंद्रावरील ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलून त्याठिकाणी १० एमव्हीए क्षमतेचा उच्च क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजापूर वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे या गावांमधील विजेची स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. पूर्वी या ठिकाणी ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर असल्याने परिसरातील शेती आणि घरगुती वीजवापरावर मर्यादा येत होत्या. मात्र, आता हा ट्रान्सफॉर्मर १० एमव्हीए क्षमतेत रूपांतरित करण्यात आल्याने विजेची क्षमता दुप्पट झाली आहे.
या बदलामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावणारा लो-व्होल्टेजचा प्रश्न कायमचा निकाली निघाला असून, नागरिकांना आता पूर्ण दाबाने आणि सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. विशेषतः शेतीसाठी लागणाऱ्या वीजपुरवठ्यात सुधारणा झाल्यामुळे कमी दाबाने मोटर पंप जळण्याच्या किंवा वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारी आता पूर्णपणे थांबणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त भार येत होता. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात येताच आमदार अमोल खताळ यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने क्षमता वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केवळ राजापूरच नव्हे, तर तालुक्यातील इतरही अनेक उपकेंद्रांवर १० एमव्हीए चे २० एमव्हीए मध्ये रूपांतर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
“शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून पीक घेतो, मात्र वीज समस्येमुळे त्याचे मोठे नुकसान होत होते. कमी दाब आणि अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांवर परिणाम होत होता. शेतकऱ्यांच्या या वेदना ओळखून आम्ही महावितरणकडे आग्रही मागणी केली होती. आज ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढल्याने शेतकऱ्यांना हक्काची वीज मिळणार आहे. यापुढेही तालुक्यातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
दरम्यान “अतिरिक्त भारामुळे आमचे मोटर पंप वारंवार जळत होते. आता क्षमता वाढल्याने व्होल्टेज चांगले मिळेल आणि आमचे नुकसान टळेल. आमदार साहेबांनी वेळीच लक्ष दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.