संगमनेर शहरातील ‘कवी अनंत फंदी’ नाट्यगृह लवकरच रसिकांच्या सेवेत!
◻️ ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी केली नाट्यगृहाची पाहणी
संगमनेर LIVE | संगमनेर हे केवळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध शहर नसून ती एक महान सांस्कृतिक परंपरा लाभलेली नगरी आहे. या शहराचा हाच वारसा जपत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अत्यंत अद्ययावत असे ‘कवी अनंत फंदी’ खुले नाट्यगृह साकारत आहे. या नाट्यगृहामुळे संगमनेरच्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून, लवकरच येथे मराठी नाटकांचे प्रयोग दिमाखात रंगणार आहेत, असा विश्वास ज्येष्ठ मराठी कलावंत प्रशांत दामले यांनी व्यक्त केला.
प्रशांत दामले यांनी आज शुक्रवारी शहरातील ‘कवी अनंत फंदी’ नाट्यगृहास सदिच्छा भेट देऊन कामाच्या प्रगतीची पाहणी केली, यावेळी आमदार सत्यजीत तांबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रशांत दामले यांनी या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, संगमनेरमध्ये नाटकाचे प्रयोग करण्याची माझी अनेक दिवसांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. या नाट्यगृहाचे काम आता अंतिम टप्प्यात असून पुढील काही महिन्यांत ते प्रेक्षक आणि कलाकारांसाठी खुले होईल.
यावेळी त्यांनी एक महत्त्वाची सूचना केली की, केवळ शासनावर जबाबदारी न टाकता नाट्यगृहाची स्वच्छता, पवित्रता आणि सन्मान राखणे ही आपल्या सर्वाची नैतिक जबाबदारी आहे. सार्वजनिक मालमत्तेची जपणूक आपण स्वतःच्या वस्तूंप्रमाणे केली पाहिजे. तसेच, संगमनेर नगर परिषदेने उन्हाळी सुट्टीत येथे ‘नाट्यवाचन चळवळ’ सुरू करावी, ज्यामुळे या परिसरातून नवीन आणि कसदार कलाकार निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी दामले यांनी आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना एक विशेष साकडे घातले. महाराष्ट्रात सध्या ४६ नाट्यगृहे कार्यरत असून, सरकारने ही संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. आमदार तांबे यांनी मराठी नाटक आणि कलाकारांच्या हितासाठी राज्यात जास्तीत जास्त नाट्यगृहे कशी उभारली जातील, याचा आग्रह धरला पाहिजे, जेणेकरून आपली समृद्ध कला जोपासली जाईल. नवीन आणि उदयोन्मुख कलाकारांनी आपल्याला जे उत्तम जमते, त्यात प्राविण्य मिळवावे आणि आपले गुण कौशल्य चांगल्या सादरीकरणातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावेत, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
आमदार सत्यजीत तांबे यांनी याप्रसंगी आपली भूमिका मांडताना सांगितले की, कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे काम स्थानिक कलाकार आणि नागरिकांच्या सूचनांचा अभ्यास करून अत्यंत नियोजित पद्धतीने सुरू आहे. या प्रक्रियेत प्रशांत दामले यांचे मार्गदर्शन आम्हाला सातत्याने मिळत आहे. त्यांच्या लोकप्रिय नाटकांचे प्रयोग या नवीन वास्तूत लवकरच सादर होतील, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे, असे म्हटले.
दरम्यान या पाहणी दौऱ्यावेळी उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, नितीन अभंग, मुख्याधिकारी दयानंद गोरे, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे, नाट्य परिषदेचे डॉ. संजय दळवी, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे, विशाल कदम, मोहसीन शेख, डॉ. सुनील चव्हाण, डॉ. रवींद्र गायकवाड, अंतुन तथा बाळासाहेब घोडके, गणेश राजदेव यांसह रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.