शेतकरी कुटुंबातून घडलेले लोकाभिमुख नेतृत्व - सौ. प्रभावतीकाकी घोगरे
◻️ जागतिक महिला दिनी मातीतून उगवलेलं लढाऊ रणरागिणीचा प्रेरणादायी प्रवास!
संगमनेर LIVE |
आजच्या आधुनिक काळात महिलांनी चूल आणि मूल ही चौकट मोडून प्रत्येक क्षेत्रात आपली उत्तुंग भरारी घेतली आहे. समाजकारण, राजकारण, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. अशाच जिद्दी, कर्तृत्ववान आणि मातीशी घट्ट नाळ जोडून कार्य करणाऱ्या मोजक्या नेतृत्वांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे सौ. प्रभावती जनार्दन घोगरे.
आज ८ मार्च, जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप...
समृद्ध वारसा आणि ग्रामविकासाचा पाया
एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रभावती काकींना घरातूनच सामाजिक आणि राजकीय जाणीवेचे बाळकडू मिळाले. माजी आमदार स्व. चंद्रभानदादा पाटील घोगरे यांच्यासारखे जनतेशी नाळ जोडलेले सासरे आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जनसेवेची परंपरा जपणारे स्व. शंकरनाना खर्डे यांच्यासारखे वडील, असा दुहेरी आणि समृद्ध वारसा त्यांना लाभला. याच संस्कारांमधून समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र तळमळ त्यांच्या मनात निर्माण झाली.
त्यांचा राजकीय प्रवास ‘लोणी खुर्द’ ग्रामपंचायतीपासून सुरू झाला. गावाचा विकास, महिलांचे सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा आणि शिक्षणावर विशेष भर दिला.
अन्यायाविरुद्धचा बुलंद आवाज
सौ. प्रभावती घोगरे यांची ओळख केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर त्यांच्या ‘धाडसी भूमिकेसाठी’ आणि ‘स्पष्टवक्तेपणासाठी’ आहे. अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवणे आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य. अल्पावधीतच त्या परिसरातील महिलांसाठी एक खंबीर आधार आणि प्रेरणास्थान बनल्या आहेत.
राजकीय मैदानावरील ‘रणरागिणी’
सामाजिक कार्यासोबतच राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार निलेश लंके यांच्या प्रचारात त्यांनी झंझावाती दौरा करत मतदारांपर्यंत पक्षाचा विचार पोहोचवला.
सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो त्यांचा ‘शिर्डी विधानसभा’ निवडणूक लढवण्याचा धाडसी निर्णय! या निवडणुकीत जरी पराभव पत्करावा लागला असला, तरी राज्याच्या राजकीय पटलावर त्यांनी आपले अस्तित्व ठळकपणे अधोरेखित केले. ही निवडणूक केवळ एक लढत नव्हती, तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी उभा केलेला तो एक लढा होता. त्यांच्या याच सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत ‘महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी’ त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषीभूषण ते उत्तम वक्त्या.. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व
राजकारण आणि समाजकारणाच्या धकाधकीतही त्यांनी आपली ‘शेतकरी’ ही मूळ ओळख जपली आहे. त्या एक प्रगतिशील आणि कष्टाळू शेतकरी आहेत. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्या दुग्ध व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांच्या या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने २०१६ मध्ये त्यांना ‘जिजामाता कृषीभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. तसेच, सह्याद्री वाहिनीवर ‘शेतकरी प्रतिनिधी’ म्हणूनही त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत.
या रणरागिणीचे आणखी एक लोभस रूप म्हणजे त्यांची साहित्याची आवड! उत्तम वक्तृत्व लाभलेल्या प्रभावती काकींना कविता, चारोळ्या आणि वात्रटिका लिहिण्याची विशेष आवड आहे.
जिव्हाळ्याचे नाते
त्या केवळ एक राजकीय नेत्या नाहीत, तर सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या, त्यांना समजून घेणाऱ्या एक ‘मैत्रीण’ आहेत. लोकांप्रती असलेली त्यांची हीच आत्मीयता त्यांना खऱ्या अर्थाने ‘लोकाभिमुख नेतृत्व’ बनवते.
सौ. प्रभावतीकाकी घोगरे यांचा हा प्रवास म्हणजे संघर्ष, जिद्द आणि निस्सीम समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे. दृढ इच्छाशक्ती असेल तर महिला कोणत्याही क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या या नेतृत्वाला आणि त्यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम!
काकीना त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस अनंत शुभेच्छा!
- लेखक गौतम आहेर पाटील, लोणी (ता. राहाता)