विकसित महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी ‘नारी शक्ती’चे योगदान मोलाचे - विखे पाटील
◻️ जनता दरबारात लाडक्या बहिणींशी संवाद; युपीएससीत यश मिळविणाऱ्या धनंजय दिघेचा गौरव
संगमनेर LIVE (लोणी) | विकसीत महाराष्ट्राचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी नारी शक्तीचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने महिलांच्या उत्कर्षासाठी घेतलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ जिल्ह्यातील लाडक्या बहीणींना मिळावा म्हणून आपण प्रयत्नशिल राहणार आहोत. अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांच्या भेटीसाठी प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात जनता दरबाराचे आयोजन केले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भेटीसाठी आलेल्या सर्व महिलांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या नागरीकांच्या प्रश्नांची निवेदन स्विकारून त्यांनी तातडीने आधिकाऱ्यांना उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या.
उपस्थित महिलांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्याच्या विकासामध्ये महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरु झालेल्या बचत गटांच्या चळवळीने महिलांच्या आर्थिक उत्कर्षाला मोठी साथ दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. या बरोबरीनेच आता अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण, योजनेतील लाभार्थ्याना आर्थिक साक्षर करुन, लाभाचे आणि गुंतवणूकीचे मार्गदर्शन करण्याचे धोरणही घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात आत्तापर्यत २७ लाख लखपती दिदि झाल्या असून, अगामी आर्थिक वर्षात आणखी २५ लाख लखपती दिदि करण्यासाठी महायुती सरकारने पुढाकार घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १ लाख ८० हजार ४४४ महिलांना लखपती दिदि बनविण्याचे उदिष्ठ प्राप्त झाले असून, आत्तापर्यंत १ लाख ३७ हजार २३४ महिला या लखपती दिदि झाल्या असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी या प्रसंगी दिली.
जिल्ह्यातील महिला बचत गटांना ३५३ कोटी ९ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून, बचत गटांच्या उत्पादित मालाला चांगली बाजारपेठ निर्माण करुन देण्यासाठी जिल्हास्तरावर आता उमेद मॉलची निर्मिती करण्याचा निर्णयही महायुती सरकारने घेतला आहे. आपल्या जिल्ह्यातही अशा पध्दतीचा मॉल निर्माण करुन, बचत गटांच्या उत्पादनाला पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत जोर्वे येथील विद्यार्थी धनंजय संजय दिघे याने ५२९ वी रॅक मिळवून आयपीएस होण्याचा मान मिळविल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्याचा सत्कार करुन अभिनंदन केले. या बरोबरीनेच अन्य विद्यार्थ्यानीही मिळविलेल्या यशाचे कौतूक करुन, प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी या सर्व जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी केलेली मेहनत आणि दाखविलेली जिद्द ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रशासकीय सेवेतील या सर्वाचा प्रवेश हा जिल्ह्याचा नावलौकीक वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.
या जनता दरबारामध्ये विविध शासकीय विभागांच्या समस्यांच्या प्राप्त झालेल्या निवेदनावर आधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी. आलेल्या कोणत्याही तक्रारी प्रलंबित न ठेवता गावात जावून या समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश त्यांनी आधिकाऱ्यांना दिले.