धानोरे येथे छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण
◻️ महंत दत्तगिरी महाराजांच्या हस्ते ‘शिवतीर्था'चे लोकार्पण
संगमनेर LIVE (सात्रळ) | श्री क्षेत्र धनेश्वर देवस्थान, धानोरे घाट येथे शिवजयंतीचा उत्साह यंदा द्विगुणित झाला होता. या मंगल दिनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य सिंहासनारूपी पुतळ्याची प्रतिष्ठापना आणि ‘शिवतीर्था’चा अनावरण सोहळा अत्यंत दिमाखात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
श्री क्षेत्र धनेश्वर देवस्थान समिती आणि धानोरे (ता. राहुरी) येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सोहळ्यादरम्यान ‘शिवतीर्था’चे लोकार्पण वरंवडी देवस्थानचे महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली. महाराजांच्या मूर्तीला मंगलमयी ‘दुग्ध अभिषेक’ घालण्यात आला. यावेळी उपस्थित शिवभक्तांच्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सनईच्या सुमधुर सुरांनी वातावरणात एक वेगळीच चैतन्यमय ऊर्जा निर्माण केली होती.
अनावरण सोहळ्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाराजांची भव्य महाआरती संपन्न झाली. यावेळी उपस्थित जनसमुदायाचा उत्साह ओसंडून वाहात होता. आरतीनंतर आणि अनावरणाच्या क्षणी आकाशात करण्यात आलेल्या फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीने उपस्थितांचे डोळे दिपवून टाकले. रात्रीच्या वेळी उजळून निघालेले आकाश आणि शिवरायांचे ते तेजस्वी रूप पाहून प्रत्येक शिवभक्ताचा उर अभिमानाने भरून आला होता.
“हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा” या प्रेरणेने प्रेरित होऊन धानोरे ग्रामस्थांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. शिवतीर्थ व्यवस्थापन समिती, गावातील सर्व युवक मंडळे आणि अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळवले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.
दरम्यान या सोहळ्यामुळे धानोरे घाट परिसरातील धार्मिक आणि ऐतिहासिक वैभवात मोलाची भर पडली असून, हे ‘शिवतीर्थ’ येणाऱ्या काळात पर्यटकांच्या आणि शिवभक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास शिवतीर्थ व्यवस्थापन समितीने व्यक्त केला आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.