संगमनेरची लेक बनली जिल्हाधिकारी, तर आयपीएस झाला सुपुत्र!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्याकडून ऋतुजा गायकवाड आणि धनंजय दिघे यांच्या यशाचे कौतुक
संगमनेर LIVE | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निकालात संगमनेर तालुक्याच्या दोन सुपुत्रांनी उत्तुंग भरारी घेतली असून, संपूर्ण तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
यामध्ये नान्नज दुमाला येथील ऋतुजा अशोक गायकवाड हिने नागरी सेवा परीक्षेत देशात १०६ वा क्रमांक पटकावून आपले जिल्हाधिकारी (IAS) होण्याचे स्वप्न साकार केले आहे, तर जोर्वे येथील धनंजय संजय दिघे यांनी ५२९ व्या क्रमांकासह यश संपादन करत भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) आपली मोहोर उमटवली आहे.
ऋतुजा गायकवाड हिने ग्रामीण पार्श्वभूमी असूनही सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी एक नवा आदर्श ठरले आहे. दुसरीकडे, अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत यश मिळवून धनंजय दिघे यांनी खाकी वर्दी परिधान करण्याचे आपले स्वप्न सत्यात उतरवले आहे. या दोन्ही यशवंतांमुळे संगमनेर तालुक्यात आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“ग्रामीण भागातील मुलांमध्ये उपजत गुणवत्ता ठासून भरलेली असते, फक्त तिला कष्टाची आणि योग्य मार्गदर्शनाची जोड हवी. ऋतुजा आणि धनंजय यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद असून इतर हजारो विद्यार्थ्यांसाठी ते ऊर्जा देणारे ठरेल.” असे कौतुकापर गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.
या यशाची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी नान्नज दुमाला आणि जोर्वे येथे प्रत्यक्ष जाऊन दोन्ही यशस्वी विद्यार्थ्याचा त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याच्या कष्टाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यार्थ्याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.