शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार - सरपंच निकीता भोसले

संगमनेर Live
0
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार - सरपंच निकीता भोसले

◻️​ जागतिक महिला दिनी पानेगावात कायदेशीर मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रम


संगमनेर LIVE (​पानेगाव) | नेवासे तालुक्यातील पानेगाव येथे रविवारी (दि. ८) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आली. 

या प्रसंगी उपस्थित महिलांशी संवाद साधताना लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता भोसले-आंबेकर यांनी महिला सक्षमीकरणाचा निर्धार व्यक्त केला. शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात, मात्र त्यांची केवळ माहिती असून चालणार नाही तर ती तळागाळातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. गावातील प्रत्येक महिलेला विकास प्रक्रियेत सोबत घेऊन या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

​कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत उपसरपंच सुरेश जंगले यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी आगामी सामूहिक विवाह सोहळ्याकरिता ग्रामपंचायत विशेष आर्थिक तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या इच्छुकांना यामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी तातडीने ग्रामपंचायतीकडे आपली मागणी नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या उपक्रमामुळे गावातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, सामाजिक एकोपा वाढण्यास मदत होणार आहे.

​महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि हक्कांच्या रक्षणासाठी ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले. त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर भाष्य केले. कायद्याची माहिती नसल्यामुळे अनेकदा महिलांवर अन्याय होतो, तो टाळण्यासाठी त्यांनी महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे शासन स्तरावरील विविध योजनांची तांत्रिक माहिती देऊन त्यांनी उपस्थित महिलांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या आणि त्यावर मार्गदर्शन केले. 

दरम्यान या कार्यक्रमाला पानेगाव गावातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी महिला दिनाचा उत्साह द्विगुणित केला. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !