संगमनेर तालुक्यातील तीन सुपुत्रांचा प्रशासकीय सेवेत झेंडा!
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ऋतुजा गायकवाड, धनंजय दिघे आणि विश्वनाथ सांगळे यांचा गौरव
संगमनेर LIVE | “जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कष्टांची खरी जाण असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रशासकीय सेवेत यश मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यानी संगमनेर तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे," असे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेर तालुक्यातील तीन गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी तालुक्यातील तीन रत्नांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. यामध्ये यूपीएससी परीक्षेत १०६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आयएएस (IAS) पदाला गवसणी घालणाऱ्या ऋतुजा गायकवाड यांचा तिरंगा चौक येथे गौरव करण्यात आला. सोबतच, जोर्वे येथील धनंजय संजय दिघे यांनी यूपीएससीमध्ये यश मिळवून आयपीएस (IPS) होण्याचा मान मिळवला, तर सोनेवाडी येथील विश्वनाथ लहानू सांगळे यांची एमपीएससी परीक्षेतून पीएसआय (PSI) पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी स्वतः सोडवण्याची सवय असते. ग्रामीण भागातील शिक्षण हे त्यांच्यासाठी एका विद्यापीठासारखे असून, अडचणींतून मार्ग काढण्याची जिद्द त्यांच्यात उपजत असते. या विद्यार्थ्यानी मिळवलेले यश तालुक्यातील नवीन पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. आगामी काळात प्रामाणिकपणे आणि निर्णयक्षमता वाढवून जनतेची सेवा करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी तिन्ही यशस्वी विद्यार्थ्यानी आपली मनोगते व्यक्त करून आपल्या यशाचे श्रेय कुटुंबिय आणि मार्गदर्शकांना दिले. याप्रसंगी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून ‘एकविरा फाउंडेशन’तर्फे आयोजित महिला क्रिकेट स्पर्धेला नवनिर्वाचित आयएएस अधिकारी ऋतुजा गायकवाड यांनी भेट दिली. केवळ भेटच दिली नाही, तर त्यांनी स्वतः बॅट हातात घेऊन मैदानावर फटकेबाजी केली, ज्यामुळे उपस्थित महिला खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला.