पुणे येथून अपहरण केलेल्या व्यापाऱ्याची हिवरगाव पावसा टोलनाक्यावर सुटका
◻️ दोन कट्टे आणि सहा जिवंत काडतुसांसह पाच जण गजाआड!
संगमनेर LIVE | पिंपरी-चिंचवड येथून एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करून पसार होणाऱ्या टोळीचा संगमनेर पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून थरारक रित्या अटक केली आहे. हिवरगाव पावसा टोलनाक्यावर सापळा रचून ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून २ गावठी कट्टे, ६ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ११ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोमवारी, ९ मार्च २०२६ रोजी रात्री श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना माहिती मिळाली की, पिंपरी-चिंचवडमधील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून आरोपी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून (युपी - ७० - एचआर - ९२७२) आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत आहेत. ही माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष फड आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शांताराम मालुजकर यांचे पथक हिवरगाव पावसा टोलनाक्यावर तैनात झाले. दरम्यान, संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनीही खांडगाव फाटा येथे नाकाबंदी लावली होती. रात्री ११ च्या सुमारास संशयित स्विफ्ट कार टोलनाक्यावर येताच पोलिसांनी अत्यंत शिताफीने ती अडवली.
पोलिसांनी अडवलेल्या गाडीची कसून झडती घेतली असता, त्यामध्ये उत्तर प्रदेश राज्यातील पाच तरुण संशयास्पद रित्या बसलेले आढळले. यामध्ये चंद्रशेखर दीपकचंद्र गौड (वय ३४), दिलीप मोहनलाल सरोज (वय २८), १७ वर्षीय अल्पवयीन तरुण, अनिल गिरीधारीलाल सरोज (वय २६) आणि मुकेशकुमार राममुदर चव्हाण (वय २४) यांचा समावेश होता. या आरोपींच्या झडती दरम्यान पोलिसांना दोन गावठी बनावटीचे कट्टे, सहा जिवंत काडतुसे, पाच महागडे मोबाईल, एक मनगटी घड्याळ आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे.
याप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १४०(१), १४८(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल असून, पुढील कार्यवाहीसाठी आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
दरम्यान या धाडसी कारवाईत संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, सुनील ढाकणे, शांताराम मालुजकर, तसेच चालक फड, झोडगे आणि उगले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तर, या थरारक कारवाई दरम्यान हिवरगाव पावसा टोलनाक्याचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनीही पोलिसांना मोठे सहकार्य केले.