पेमगिरी शहागडासाठी दीर्घकालीन विकास आराखडा तयार करा - आमदार अमोल खताळ
◻️ २८ ऑगस्ट ‘हिंदवी स्वराज्य संकल्प दिन’ म्हणून साजरा करण्याचीही शासनाकडे केली मागणी
संगमनेर LIVE (मुंबई) | संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पेमगिरी येथील 'शहागड' किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने तातडीने दीर्घकालीन विकास आराखडा तयार करावा, अशी जोरदार मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. तसेच, छत्रपती शहाजी महाराज आणि बाल शिवबांच्या पराक्रमाची साक्ष देणारा २८ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात “हिंदवी स्वराज्य संकल्प दिन” म्हणून साजरा करण्यात यावा, असेही त्यांनी सरकारला सुचविले.
आमदार खताळ यांनी सभागृहात शहागडाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की, या ऐतिहासिक दुर्गाचे पुरेसे जतन व संवर्धन होत नसल्याने हा अमूल्य वारसा सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे. जर योग्य वेळी नियोजन आणि संवर्धन झाले नाही, तर या ऐतिहासिक ठेव्याचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
शहागडाच्या संवर्धनाबाबत आग्रही भूमिका मांडताना आमदार खताळ यांनी सांगितले की, पुरातत्व, सांस्कृतिक आणि पर्यटन विभागांनी आपापसात समन्वय साधून किल्ल्याच्या सर्वागीण विकासासाठी एक ठोस मास्टर प्लॅन तयार करणे गरजेचे आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि मूळ बांधकाम जपून तिथे पर्यकांसाठी आवश्यक असणाऱ्या दर्जेदार पायाभूत सुविधा विकसित केल्या जाव्यात. या स्थळाला अधिकृतरीत्या ‘ऐतिहासिक पर्यटन स्थळ’ म्हणून घोषित करून तिथे शासनामार्फत विशेष निधीची तरतूद व्हावी, जेणेकरून स्वराज्याचा हा संकल्प दिन आणि येथील प्रेरणादायी इतिहास जनमानसापर्यंत पोहचण्यास मदत होईल.
“पेमगिरी येथील शहागडाचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या किल्ल्याचे संवर्धन झाल्यास स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होईलच, पण पर्यटन वाढल्यामुळे परिसराच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळेल,” असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.
दरम्यान आपल्या इतिहासाची आणि स्वराज्याच्या प्रेरणेची ही पवित्र भूमी जपणे ही आपली सर्वाची सामूहिक जबाबदारी आहे. सरकारने या प्रमुख मागण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी यावेळी केली.