अहिल्यानगर मनपात पहिल्यांदाच ‘घोडेबाजार’ थांबला - डॉ. सुजय विखे
◻️ शरद पवार गट थेट भाजपमध्ये विलीन होणार?'; प्राजक्त तनपुरेंच्या 'त्या' वक्तव्याचा समाचार
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | अहिल्यानगर महानगरपालिकेवर भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट) महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता राखली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदाधिकारी निवडीत अहिल्यानगर मनपात पहिल्यांदाच ‘घोडेबाजार’ थांबल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात उपस्थित असताना त्यांनी मनपातील सत्तास्थापनेसह आगामी राहुरी विधानसभेच्या राजकारणावरही डॉ. विखे यांनी सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची चांगलीच फिरकी घेतली.
सत्कार समारंभात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “अहिल्यानगरच्या जनतेने भाजप आणि अजित पवार गटाला पूर्ण बहुमत दिले आहे. मी आणि आमदार संग्राम जगताप यांनी नगरकरांना जी आश्वासने दिली होती, त्यावर जनतेने पूर्ण विश्वास ठेवला. यामुळे आमची जबाबदारी अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे, सभापती निवडीत यंदा पहिल्यांदाच घोडेबाजार थांबल्याचे चित्र दिसले आणि पहिल्यांदाच योग्य व्यक्तीला योग्य खुर्ची मिळाली.”
तसेच, “अजित पवारांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री आणि नवीन उपमुख्यमंत्री आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. त्यांच्या माध्यमातून शहरासाठी भरघोस निधी आणून नगरकरांना दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी गुहा येथील एका कार्यक्रमात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ‘आपले सरकार' असा दोनदा उल्लेख करत, “तुमचे २४० आणि आमचे १० असे २५० आमदार सत्तेत आहेत,” असे सूचक वक्तव्य केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. सुजय विखेंनी जोरदार पलटवार केला.
टोला लगावताना डॉ. विखे म्हणाले, “अगोदर शरद पवार गटाचे अजित पवार गटासोबत विलीनीकरण होईल, अशा चर्चा सुरू होत्या. आता मात्र शरद पवार गटाच्या थेट भाजपसोबत विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हे विलीनीकरण करण्याचा अधिकार त्यांच्या पक्षाने तनपुरेंना दिला आहे का, हे मला माहीत नाही. आमच्याकडे मात्र असा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहे.”
राहुरी विधानसभेच्या जागेवर दावा ठोकताना डॉ. विखे यांनी स्पष्ट केले की, “राहुरी विधानसभेची जागा ही भाजपचीच आहे. भाजप हा सर्व्हे आणि जनमतावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जो उमेदवार देतील, त्याला आम्ही निश्चितपणे निवडून आणू. आता कोणी काय बोलावे, हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे; परंतु येथील पुढचा आमदार हा भाजपचाच होणार,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि राहुरीतील भाजपचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या महत्त्वपूर्ण भेटीनंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज राहुरी विधानसभेबाबत केलेले हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असून, याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.