“व्यसन सोडा, बाबासाहेबांच्या विचारांची नशा करा!” - ना. रामदास आठवले

संगमनेर Live
0
“व्यसन सोडा, बाबासाहेबांच्या विचारांची नशा करा!” - ना. रामदास आठवले 

◻️​ मुंबईत ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारां’चे वितरण

संगमनेर LIVE (​मुंबई) | “व्यसन ही केवळ वैयक्तिक समस्या नसून ती संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारी सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईने व्यसनाच्या विळख्यात अडकू नये. मी सुद्धा नशा करतो, पण ती नशा अमली पदार्थाची नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आयोजित सन २०२० ते २०२५ या पाच वर्षातील ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

​आपल्या खास शैलीसाठी प्रसिध्द असलेल्या नामदार आठवले यांनी भाषणाची सुरुवातचं खुमासदार कवितांनी केली

​“जर केली तुम्ही रोज नशा, तर समाजात होईल तुमचा हशा, तुम्ही आहात आमची फार मोठी आशा आणि मराठी आहे आमची भाषा! मग का करता तुम्ही नशा? मी करतो नशा.. पण ती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नशा, म्हणून आहे माझ्या जीवनात फार मोठी आशा.”

​या कवितेनंतर सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. पुढे त्यांनी अंधश्रध्देवर प्रहार करत म्हटले की, भोंदूबाबांची भक्ती करून मुक्ती मिळणार नाही, तर व्यसनमुक्तीनेच महाराष्ट्राची शक्ती वाढेल.

​या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे आणि प्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर म्हणाले की, व्यसनमुक्त समाज घडवणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिक आणि संस्थेने यात एकत्रितपणे योगदान देणे आवश्यक आहे. 

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा गौरव करताना म्हटले की, हे कार्यकर्ते अंधारात प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखे असून एखादे कुटुंब वाचवणे हेच त्यांचे खरे यश आणि आशीर्वाद आहे.

दरम्यान ​या विशेष सोहळ्यात गेल्या ५ वर्षाच्या कालावधीतील एकूण १०० व्यक्ती आणि १३ संस्थांना त्यांच्या बहुमोल कार्यासाठी गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्त १०० व्यक्तींमध्ये ८८ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश होता. या पुरस्कारांमध्ये वैयक्तिक पुरस्कारासाठी १५ हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व शाल, तर संस्थात्मक पुरस्कारासाठी ३० हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व शाल असे त्याचे वितरण करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !