श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे १३५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ
◻️ रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील श्री क्षेत्र निझर्णेश्वर महादेव मंदिर प्रांगणात सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेली आणि वैकुंठवासी नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने चालत आलेली ही महान परंपरा यंदा १३५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. रामनवमी ते हनुमान जयंती या कालखंडात संपन्न होणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवारी (दि. २६) अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात सुरुवात झाली.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सकाळी गावातून भव्य कलश आणि ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर मंदिर परिसरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या सप्ताह काळात दररोज पहाटे काकडा, भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि विविध धार्मिक भक्तीमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सव आणि गोपाजी बाबा प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सकाळी १० वाजता महामंडलेश्वर १००८ गोरख गिरीजी महाराज यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल आणि त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येईल. यानंतर या अखंड सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे.
दरम्यान, भाविकांनी या धार्मिक सोहळ्यानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री क्षेत्र निझर्णेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.