सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आयुष्य वेचणारे ‘कृतीशील संत’ - मल्हार अरणकल्ले
◻️ सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात १६ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन
संगमनेर LIVE | स्वातंत्र्यलढ्यातील जाज्वल्य इतिहास, समाजविकासाचा ध्यास आणि वयाच्या ८४ व्या वर्षी ‘दंडकारण्य अभियाना’तून पर्यावरणाची लोकचळवळ उभी करणारे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे खऱ्या अर्थाने समाजाचे 'कृतीशील संत' होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मल्हार अरणकल्ले यांनी काढले. अमृत उद्योग समूहाच्या वतीने भाऊसाहेब थोरात यांच्या १६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील ‘प्रेणास्थळ' येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकताना अरणकल्ले म्हणाले की, वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी देशसेवेसाठी स्वातंत्र्यसंग्रामात झोकून देणाऱ्या भाऊसाहेबांवर डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या विचारांचे खोल संस्कार झाले होते. हाच ध्येयवाद त्यांनी आयुष्यभर जपला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी केवळ राजकारण न करता सहकार, शेती, शिक्षण आणि दूध व्यवसायाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या सर्वागीण विकासाची पायाभरणी केली. विशेष म्हणजे, त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात तालुक्याच्या विकासाचा पंचवार्षिक आराखडा तयार केला, जो त्यांच्या दूरदृष्टीचा पुरावा ठरला.
सहकारमहर्षीचे नेतृत्व हे केवळ सत्तेसाठी नसून ते संघर्षातून तावून सुलाखून निघालेले होते. संगमनेर तालुक्याच्या हक्काच्या ३० टक्के पाण्यासाठी त्यांनी दिलेला लढा आजही आदर्श मानला जातो. जनसामान्यांच्या हितासाठी स्वतःच्या सरकारविरोधात रिझर्व बॅकेवर मोर्चा काढण्याचे अभूतपूर्व धाडस त्यांनी दाखवले. वयाच्या ८४ व्या वर्षी जेव्हा अनेकजण सार्वजनिक जीवनातून निवृत्त होतात, तेव्हा भाऊसाहेबांनी निसर्ग संवर्धनासाठी ‘दंडकारण्य अभियान’ सुरू करून एक मोठी लोकचळवळ उभी केली, ज्याचा फायदा आज संपूर्ण परिसराला होत आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव करताना अरणकल्ले यांनी नमूद केले की, भाऊसाहेबांनी आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा आणि मनाचा सच्चेपणा जपला. हाच लोकसेवेचा आणि नैतिकतेचा वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सक्षमपणे पुढे नेला आहे. आजच्या काळात जिथे वैयक्तिक स्वार्थासाठी एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती वाढली आहे, तिथे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा ‘सहकार’ मंत्र देणाऱ्या अशा नेतृत्वाची महाराष्ट्राला मोठी गरज आहे. तरुणांनी या थोर महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजकार्यात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान या पुण्यस्मरण दिनाच्या पूर्वसंध्येला नूतन ऑडिटोरियम हॉलमध्ये प्रा. विनोद राऊत व सहकाऱ्यांनी ‘भजन संध्या’ सादर केली. संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्या विविध अभंगांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. “बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल” या सुरांमध्ये उपस्थित जनसागर पूर्णपणे दंग झाला होता, ज्यामुळे कार्यक्रमाला एक आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले.