उद्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतीदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

संगमनेर Live
0
उद्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतीदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

◻️ ​ज्येष्ठ संपादक मल्हार अरणकल्ले यांचे व्याख्यान तर, स्मृतीस्थळी आदरांजलीचा कार्यक्रम


​संगमनेर LIVE | अमृत उद्योग समूहाचे जनक, स्वातंत्र्यसेनानी आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे प्रेरणास्थान सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

या उपक्रमांची सुरुवात आज, शुक्रवार दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी कारखान्याच्या प्रशासकीय भवनात आयोजित करण्यात आलेल्या सुश्राव्य ‘भजनसंध्येने’ होणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यक्रम उद्या, शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतीस्थळी पार पडणार असून, यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेबांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात येईल. 

या आदरांजली सोहळ्यानंतर साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ संपादक व लेखक मल्हार अरणकल्ले हे ‘स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांचे जीवन चरित्र’ या विषयावर आपले विचार गुंफणार असून, या व्याख्यानातून सहकारमहर्षीच्या नेतृत्वाचा आणि त्यांनी ग्रामीण समाजासाठी उभ्या केलेल्या आदर्शांचा आढावा घेतला जाणार आहे.

​सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी केवळ सहकार संस्था उभ्या केल्या नाहीत, तर त्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्याचे मोठे कार्य केले. स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभागानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सहकाराच्या मूल्यांची रुजवण करण्यासाठी समर्पित केले. 

जिल्हा आणि राज्य सहकारी बॅकेच्या माध्यमातून त्यांनी शेती आणि शेतीपूरक उद्योगांना मोठी उभारी दिली. सचोटी, पारदर्शकता आणि शेतकरी हिताचा ध्यास या त्रिसूत्रीवर आधारित अमृत उद्योग समूह ही त्यांच्या कार्याची जिवंत परंपरा मानली जाते. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि आर्थिक परिवर्तनाचे ते खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरले आहेत.

​कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी माहिती देताना सांगितले की, स्वातंत्र्य चळवळीपासून ते सहकार क्षेत्रापर्यत सहकारमहर्षीचे योगदान अतुलनीय असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी दरवर्षी या स्मृतिदिन विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

या सोहळ्याला राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. तरी या प्रेरणादायी कार्यक्रमांना संगमनेर तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !