जीवन यशस्वी करण्यासाठी ‘नाटक’ नको, ‘खरा अभिनय’ करा - योगेश सोमण
◻️ लोणी येथे पायरेन्स ‘उडान २०२६’ चे पारितोषिक वितरण संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | “जीवन यशस्वी करण्यासाठी जीवनात केवळ नाटक न करता खरा अभिनय करा. आपले करिअर स्वतः निवडा आणि ते साध्य करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. स्पर्धेला घाबरू नका, तर शेवटपर्यंत हार न मानता ‘मी जिंकणारच’ हा आत्मविश्वास बाळगा,” असा मोलाचा संदेश मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’चे संचालक योगेश सोमण यांनी दिला.
राहाता तालुक्यातील लोणी येथील पायरेन्स संस्थेच्या आयबीएमए, एमसीए, डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक कॉलेज आणि रिसर्च सेंटर आणि बी.व्होक यांच्या वतीने आयोजित ‘उडान २०२६’ या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना योगेश सोमण पुढे म्हणाले की, आजचे युग हे तीव्र स्पर्धेचे आहे, त्यामुळे केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यानी आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत. आपल्या छंद आणि कलेतूनही उत्तम करिअर घडू शकते, त्यामुळे जे काही कराल ते मनापासून करा. स्वतःचे आत्मचरित्र स्वतःलाच अभिमानाने लिहिता येईल, असे उत्तुंग कार्य करा आणि नवनवीन गोष्टींचा शोध घेत आयुष्यात पुढे जा. पायरेन्स संस्थेतील शैक्षणिक वातावरण आणि येथे मिळणाऱ्या सुविधा शहरी भागापेक्षाही अधिक दर्जेदार असून विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्याना संस्कारांची शिदोरी दिली. त्या म्हणाल्या की, शिक्षणाच्या जोरावर उच्च पदावर पोहोचत असताना आपल्या संतांचे विचार आणि शालेय जीवनातून मिळालेले संस्कार कधीही विसरू नका. वार्षिक संमेलनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. केवळ पैशाच्या मागे न धावता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून काम करा. प्रवरेच्या विद्यार्थ्याच्या पाठीशी विखे पाटील परिवार नेहमीच खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांनी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे महत्त्व विषद केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्याना पुढील प्रगतीसाठी प्रेरणा देणारा असतो, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्याना पदवी मिळवण्यासोबतच नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यानी मोठी स्वप्ने पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमात शैक्षणिक वर्षभरात विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. कल्पना साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर संचालक डॉ. मोहसिन तांबोळी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
दरम्यान या सोहळ्याला संस्थेचे सचिव डॉ. निलेश बनकर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी मोटे आणि शुभम हळनोर यांनी केले, तर आभार डॉ. निलेश बनकर यांनी मानले.