माऊलींच्या तीर्थक्षेत्रासह रस्ते आणि रेल्वेमार्गाचे प्रश्न संसदेत मांडणार - खासदार वाकचौरे

संगमनेर Live
0
माऊलींच्या तीर्थक्षेत्रासह रस्ते आणि रेल्वेमार्गाचे प्रश्न संसदेत मांडणार - खासदार वाकचौरे

◻️ ​नेवासे येथे मुक्त-संवाद कार्यक्रमात ‘आपल्या माणसाचा’ पत्रकारांशी दिलखुलास संवाद


संगमनेर LIVE (​नेवासे) | जगाला ज्ञानेश्‍वरीच्या माध्यमातून ज्ञानाचा संदेश देणारी आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेली नेवासे ही पवित्र भूमी आहे. या भूमीच्या सर्वागीण विकासासाठी, विशेषतः केंद्र सरकारच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून घेण्यासाठी मी संसदेत सातत्याने पाठपुरावा करेल, अशी ग्वाही शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली. 

नेवासे येथे पत्रकारांसोबत आयोजित ‘मुक्त-संवाद आणि सन्मान सोहळा’ कार्यक्रमात खासदार वाकचौरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे (उबाठा) मुकुंद शिनगर, बालेंद्र पोतदार, हरिभाऊ शेळके, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब तनपुरे, मुन्ना चक्रनारायण आणि नितीन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

​खासदार वाकचौरे यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा मांडताना सांगितले की, सध्या जरी मी लोकसभेत विरोधी बाकावर बसलो असले, तरी लोकहिताचे प्रश्न मांडण्यात मी कुठेही मागे नाही. आतापर्यत मी संसदेत मतदारसंघातील विविध समस्यांबाबत ११८ प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषतः अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्ग, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि अंतर्गत रस्ते सुधारण्यावर माझा प्रामुख्याने भर आहे. दळणवळणाची साधने आणि पायाभूत सोयी-सुविधा विकसित झाल्या की त्या भागातील सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर आपोआप उंचावण्यास मदत होते, म्हणूनच या प्रश्नांसाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

​आपल्या भाषणात भावनिक साद घालत खासदार पुढे म्हणाले की, “आपला माणूस आपल्यासाठी” ही माझी ओळख आता सर्वदूर पोहोचली असून, याच शब्दाचा वापर करून इतरही अनेक लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघांत काम करत आहेत. साईबाबांचा आशीर्वाद आणि जनतेच्या अफाट प्रेमामुळेच दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची कामे मार्गी लावणे शक्य होते. नेवासे तालुक्याने मला जी ओळख आणि प्रेम दिले आहे, ते मी कधीच विसरणार नाही आणि या तालुक्याचा ऋण मी विकासकामांच्या माध्यमातून नक्कीच फेडेल.

​याच कार्यक्रमात लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान राखत त्यांनी पत्रकारांसाठी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. नेवासे येथील पत्रकार भवनासाठी लवकरच भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, तसेच मतदारसंघातील पत्रकारांना संसदेचे कामकाज जवळून पाहता यावे यासाठी विशेष ‘संसद अभ्यास दौरा’ आयोजित केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. 

या कार्यक्रमाला प्रेस क्लबचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, सचिव सुहास पठाडे, एकता पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संदीप गाडेकर, जेष्ठ पत्रकार विनायक दरंदले, बन्सी एडके, चंद्रकांत दरंदले, अशोक डहाळे ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकरराव नाबदे, सतिश उदावंत, सुनिल पंडीत, मोहन गायकवाड, बाळकृष्ण पुरोहित, राजेंद्र वाघमारे, अशोक तुवर, रमेश शिंदे, दिलीप शिंदे, गणेश बेल्हेकर, संतोष टेमक, अशोक पेहरकर, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, युसूफ पठाण, मोहन शेगर, रविंद्र शेटे रमेश पाडळे, विठ्ठल उदावंत आदींसह तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे यांनी केले, तर आभार संदीप गाडेकर यांनी मानले. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !