महिलांचे देशाच्या विकासात मोठे योगदान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात
◻️ ‘एकविरा क्रीडा महोत्सवा'चा ४,५०० हून अधिक महिलांच्या सहभागात शुभारंभ
संगमनेर LIVE | कुटुंबाच्या, राज्याच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासात महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आज विविध क्षेत्रांत महिलांनी मिळवलेले यश केवळ कौतुकास्पदच नाही, तर नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धामुळे तालुक्यातील युवती व महिलांसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण झाले असून, येथून मिळणारी ऊर्जा वर्षभर कामासाठी उत्साह देणारी ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून साकारलेल्या ‘एकविरा फाउंडेशन महिला क्रीडा महोत्सव २०२६’ चा शानदार शुभारंभ बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी ४ हजार ५२५ महिला व मुलींच्या उत्साही सहभागाने मैदान दुमदुमून गेले होते.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, मदर तेरेसा आणि झाशीची राणी यांचा वारसा चालवणाऱ्या भारतीय महिलांनी आज आभाळाला गवसणी घातली आहे. संगमनेर तालुक्यातील मुलींनीही शिक्षण, क्रीडा आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठे यश मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. अभ्यास आणि कर्तव्यासोबतच खेळाचा आनंद घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे." असे म्हटले.
यावर्षीच्या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा वाढता सहभाग असून, विविध खेळांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने नावनोंदणी केली आहे. महिला क्रिकेटमध्ये १६१ संघांतील २ हजार ४१५ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत, तर रस्सीखेच स्पर्धेत १६० संघांतील १ हजार ७६० महिला सहभागी होणार आहेत. यासोबतच बॅडमिंटन स्पर्धेसाठी २५० महिलांचा सहभाग लाभला आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे या महोत्सवात ६८ वर्षीय आजींनीही सहभाग नोंदवला असून, खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी हिरवेगार मैदान, सुसज्ज प्रेक्षक गॅलरी, विशेष किट (कॅप व सणकोट) आणि थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. चौकार-षटकारांच्या आतषबाजीमुळे या स्पर्धा यंदा अत्यंत रोमांचकारी ठरणार आहेत.
या सोहळ्यात तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २२ महिलांचा सन्मानचिन्ह, शाल आणि बुके देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये आयपीएल खेळाडू माया सोनवणे, चार्टर्ड अकाउंटंट झालेली निशिगंधा कानवडे, वैज्ञानिक स्कॉलरशिप पात्र ठरलेली वैष्णवी कवडे, बीएसएफमध्ये निवड झालेली अश्विनी रोडे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर दिपाली वाकळे यांचा प्रामुख्याने समावेश होता. तसेच प्रतीक्षा चाचण, वैष्णवी जोर्वेकर, दिगंबर सराफ यांसह इतर मान्यवर महिलांचाही देखील सत्कार करण्यात आला.