डॉ. सुजय विखे पाटलांनी शब्द पाळला; होमगार्डचे ७ लाखांचे मानधन केले जमा!
◻️ भाजपकडून ३९ होमगार्डच्या मानधनाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्याकडे सुपुर्द
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | समाजातील ज्वलंत प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून शब्द पाळण्याची परंपरा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील गंभीर वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे होमगार्डच्या मानधनापोटी सुमारे ७ लाख रुपयांचा धनादेश प्रशासनाकडे सुपूर्द करून जनसेवेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र, रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक एकेरी करण्यात आली असून काही भागात डायव्हर्शन देण्यात आले होते. परिणामी, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन अपघातांची संख्याही चिंताजनकरीत्या वाढली होती.
या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी जानेवारी महिन्यात स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी नागरिक आणि वाहनचालकांच्या अडचणी समजून घेत त्यांनी वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्डची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, शासनाकडे होमगार्डच्या मानधनाची स्वतंत्र तरतूद नसल्याचे निदर्शनास येताच, “हे मानधन आपण स्वतः देऊ,” असा शब्द त्यांनी प्रशासनाला दिला होता.
या महत्त्वपूर्ण निर्णयाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तातडीने दखल घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार दोन टप्प्यांत एकूण ३९ होमगार्डनी या महामार्गावर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांच्या या सेवेमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटले आहे. दिलेला शब्द पाळत डॉ. सुजय विखे पाटील यांनी होमगार्डच्या मानधनापोटी ६ लाख ८८ हजार १९७ रुपयांचा धनादेश २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सुपूर्द केला.
राजकारणा पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणे ही विखे पाटील परिवाराची परंपरा असून, नागरिकांचा सुरक्षित प्रवास हाच आपला प्राधान्यक्रम असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी नमूद केले. केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या या भूमिकेचे राहुरी आणि नगर परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. या यशस्वी समन्वयामुळे लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने प्रशासकीय अडचणी कशा दूर होऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.