साखर कारखानदारांकडून ६५० कोटींची एफआरपी थकीत
◻️ किसान सभा आणि शेतकरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
संगमनेर LIVE | महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी २०२५-२६ च्या चालू हंगामातील सुमारे ६५० कोटी रुपयांची एफआरपी (FRP) अद्याप थकीत ठेवल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मार्च महिना संपत आला तरी हक्काचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, याप्रकरणी सरकारने तत्काळ हस्तक्षेप करून व्याजासह थकबाकी मिळवून द्यावी, अशी मागणी किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी उत्पादनात अग्रेसर असले तरी, यंदा कारखान्यांच्या दिरंगाईमुळे त्यांचे संपूर्ण शेतीचे गणित कोलमडले आहे.
ऊसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी ची रक्कम मिळणे कायद्याने बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी या नियमाचे सर्रास उल्लंघन केले आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी आता बघ्याची भूमिका न घेता, थकबाकीदार कारखान्यांवर ‘आरआरसी’ अंतर्गत तातडीने कारवाई करून त्यांचा साखर साठा जप्त करावा आणि शेतकऱ्यांचे पैसे वसूल करावेत, अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. जर कारखाने पैसे देण्यास असमर्थ असतील, तर सरकारने या थकबाकीची जबाबदारी स्वीकारून साखर निर्यात किंवा निर्यात अनुदानासारखे पर्याय वापरून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. केवळ चालू हंगामातीलच नव्हे, तर २०२४-२५ या मागील हंगामातील थकीत रक्कमही व्याजासह मिळावी, असा पवित्रा किसान सभेने घेतला आहे.
एकीकडे थकीत बिलांचा प्रश्न गंभीर असताना दुसरीकडे ऊसाच्या दरातही मोठी तफावत दिसून येत आहे. कोल्हापूर विभागातील काही कारखान्यांनी मागील हंगामात २,९५० रुपये प्रति टन दर दिला होता, मात्र यावर्षी आटपाडी तालुक्यातील दिघंची गटातील शेतकऱ्यांना केवळ २,१०० रुपये दर देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. हीच विषमता मराठवाड्यातही पाहायला मिळत असून याबाबत साखर सहसंचालकांकडे दाद मागण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत थकीत रक्कम आणि न्याय्य दर न मिळाल्यास साखर कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर आणि साखर आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान याप्रसंगी डॉ. अशोक ढवळे, कॉ. जे.पी. गावीत, डॉ. अजित नवले, कॉ. उमेश देशमुख, कॉ. दिपक लिपने, कॉ. सदाशिव साबळे, कॉ. अमोल नाईक, कॉ. अजय बुरांडे, कॉ. उद्धव पौळ, कॉ. कृष्णा सोळंखे, कॉ. शंकर सिडाम आणि कॉ. भगवान भोजने हे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.