नगर पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध-३’ अंतर्गत ४५४ बेपत्ता व्यक्तींचा घेतला शोध!
◻️ पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात विशेष मोहीम
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | राज्याचे पोलीस महासंचालक आणि महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्या सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन शोध-३’ या विशेष मोहिमेत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. ६ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण ४५४ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
समाजातून अचानक बेपत्ता झालेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना मानवी तस्करीसारख्या धोक्यांपासून वाचवणे आणि पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरी पोहोचवणे, हा या राज्यस्तरीय मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी, विशेष पथके आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) यांनी अत्यंत समन्वयाने ही कारवाई केली. या महत्त्वपूर्ण मोहिमेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून एकूण ४५४ व्यक्तींचा शोध घेण्यात आला, ज्यामध्ये ३९० महिला, ६० अल्पवयीन मुली (ज्यात जिल्ह्याबाहेरून शोधलेल्या मुलींचाही समावेश आहे) आणि ४ मुलांचा समावेश आहे. मिळून आलेल्या या सर्व महिला आणि मुलांची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले असून, कित्येक दिवसांपासून आपल्या जिवलगांच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबियांसाठी ही मोहीम देवदूतासारखी ठरली आहे.
दरम्यान ही मोहीम फत्ते करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथके तयार करण्यात आली होती. गोपनीय माहितीचे संकलन, आधुनिक व्यावसायिक कौशल्यांचा वापर आणि इतर जिल्ह्यांच्या पोलीस दलाशी साधलेला उत्तम समन्वय यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळाले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
“हरवलेल्या महिला आणि बालकांच्या शोधासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबवल्या जातील. नागरिकांना कोणत्याही बेपत्ता व्यक्तीबाबत किंवा संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी ती तातडीने पोलिसांना कळवावी,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.