राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर कॉग्रेस-वंचितचा संयुक्त धडक मोर्चा!

संगमनेर Live
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर कॉग्रेस-वंचितचा संयुक्त धडक मोर्चा!

◻️ पंतप्रधान मोदीवर हर्षवर्धन सपकाळ आणि ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आरोप

संगमनेर LIVE (​नागपूर) | मानवतेला काळीमा फासणाऱ्या विकृत ‘एपस्टिन फाईल’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्याचा खळबळजनक आरोप करत, आज नागपुरात कॉग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने संयुक्त रान पेटवले. 

या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौक ते रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयावर एक विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती हल्ला चढवत नैतिकतेच्या आधारावर पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली.

​प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले की, एपस्टिन फाईलमध्ये ज्यांची नावे आली आहेत, अशा जगभरातील अनेक नेत्यांनी राजीनामे दिले असून काहींना अटकही झाली आहे; मात्र भारतात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. “पंतप्रधान मोदी नेहमीच आपण संघाच्या संस्कारांमुळे मोठे झालो असे सांगतात आणि संघ संस्कृती व नैतिकतेचा ढोल बडवतो. जर संघात खरोखर नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी मोदींचा तातडीने राजीनामा घ्यावा," असे आवाहन त्यांनी केले. 

एपस्टिन फाईलमध्ये नाव आल्याने पंतप्रधान दबावाखाली असून, याच दबावामुळे त्यांनी अमेरिकेसोबत अन्यायकारक व्यापार करार करून देशाला आर्थिक गुलामगिरीकडे ढकलले असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. सिलेंडरच्या वाढत्या किमती आणि संसदेतील अनुपस्थितीवरून त्यांनी ‘देशातून सिलेंडर आणि संसदेतून नरेंद्र गायब झाले आहेत’ अशी उपरोधिक टीकाही केली.

​वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा देताना केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, भारताचा जुना आणि विश्‍वासू मित्र असलेल्या इराणला संकटात साथ न देऊन मोदींनी देशाच्या स्वाभिमानाचा लिलाव केला आहे. अमेरिकेच्या दबावाखाली भारतीय मालावर १८ टक्के कर लादला जात असताना अमेरिकन वस्तूंना मात्र भारतात शून्य टक्के करात सवलत दिली जात आहे, हा प्रकार देशाला गुलाम बनवणारा आहे. 

“डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आल्यानंतर त्यांनी लक्ष वळवण्यासाठी इराणवर हल्ले सुरू केले आणि भारत मात्र अमेरिकेच्या धमक्यांना घाबरून गप्प बसला आहे,” असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी येत्या १५ दिवसांत या प्रकरणावर पंतप्रधानांना जाब विचारावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

​या संयुक्त मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरून दोन्ही नेत्यांनी राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा पोलिसांवर प्रचंड दबाव असून संघाची नाचक्की होऊ नये म्हणून लोकशाही मार्गाने निघणारा मोर्चा रोखला गेल्याचा आरोप त्यांनी केला. 

या आंदोलनात आमदार विकास ठाकरे, आमदार साजिद खान पठाण, माजी मंत्री अनिस अहमद, हर्षवर्धन पुंडकर आणि सुरेश भोयर यांच्यासह दोन्ही पक्षांचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

दरम्यान नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणावरून लक्ष भरकटवण्यासाठी सरकार मुद्दाम प्रयत्न करत असल्याचे सांगत, संविधान वाचवण्यासाठी आणि हुकूमशाही प्रवृत्ती रोखण्यासाठी कॉग्रेस आणि वंचितची ही वज्रमूठ कायम राहील, असा निर्धार या सभेच्या शेवटी व्यक्त करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !