५८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ११ कोटी ६९ लाख जमा - आमदार अमोल खताळ
◻️ नमो किसान सन्मान योजनेचा ८ वा हप्ता वितरित
संगमनेर LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्यातील महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली ‘नमो किसान सन्मान योजना’ शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे. या योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील ५८ हजार ४८६ शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे अनुदान मंजूर झाले असून, सुमारे ११ कोटी ६९ लाख रुपये थेट त्यांच्या बॅक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
केंद्र सरकारच्या धर्तीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही योजना शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणणारी ठरली असून, बळीराजाला स्वावलंबी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
आमदार अमोल खताळ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, संकटाच्या काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा नियमित शेतीची कामे, शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे यासाठी सरकार नेहमीच कटिबद्ध राहिले आहे.
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेचे वर्षाला ६ हजार रुपये आणि राज्य सरकारच्या ‘नमो किसान' योजनेचे ६ हजार रुपये, असे मिळून एकूण १२ हजार रुपयांचे निश्चित अनुदान आता थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरत आहे.