संगमनेर शहरात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा!
◻️ आमदार खताळाच्या उपस्थित चंद्रशेखर चौकासह तालुका रामनामाच्या जयघोषाने दुमदुमला
संगमनेर LIVE | संगमनेर शहर आणि तालुक्यातील विविध राम मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. “संगमनेर तालुक्यात गेली अनेक वर्षे रावणराज्य होते, मात्र ते जाऊन आता खऱ्या अर्थाने रामराज्य आले आहे, म्हणूनच सर्व महापुरुषांचे जन्मोत्सव सोहळे अशा धुमधडाक्यात साजरे होत आहेत,” अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी आमदार अमोल खताळ, सौ. नीलम खताळ, उद्योजक राजेश मालपाणी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि योगराज परदेशी आदी रामभक्तांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची भावपूर्ण महाआरती करण्यात आली.
शहरातील चंद्रशेखर चौकातील राम मंदिरामध्ये श्रीराम जयंती उत्सव समितीच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली होती. दुपारी महिला रामभक्तांनी एकत्र येत पारंपरिक पध्दतीने रामजन्माचा पाळणा गात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला, ज्याने संपूर्ण परिसर भक्तीत न्हाऊन निघाला. यावेळी उपस्थित रामभक्तांनी दिलेल्या “जय श्रीराम”च्या घोषणांनी मंदिर परिसर अक्षरशः दणाणून गेला होता.
या मंगल प्रसंगी राम जन्मोत्सव समितीच्या वतीने आमदार खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह उद्योजक राजेश मालपाणी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, ऋषिकेश मोंढे, राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त उपासनी बंधू, विजय नागरीचे उपाध्यक्ष विशाल जाखडी, उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, विनय गुणे, गिरीश देशपांडे, श्रीराम गणपुले, वरद बागुल, मुन्ना जोशी, योगेश मंगलकर, राम वामन, विनायक तांबे, विलास परदेशी, योगराज परदेशी, अक्षय थोरात आणि ऋषिकेश मुळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
दरम्यान उत्सवाचे औचित्य साधून चंद्रशेखर चौक, पंजाबी कॉलनी तसेच नवीन नगर रोडवरील अभिनव नगर येथील राममंदिरांमध्ये फुलांची आकर्षक सजावट आणि झगमगत्या रोषणाईची जय्यत तयारी करण्यात आली होती. दर्शनासाठी आलेल्या हजारो भक्तांच्या सोयीसाठी रामजन्मोत्सव समितीच्या वतीने थंडगार मठ्ठ्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेण्यासाठी शहरातील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे संपूर्ण संगमनेर शहरात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.