भोंदू अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडीओ व्हायरल करू नका
◻️ पोलिसांकडून कोपरगावमध्ये दोघे ताब्यात, तिसऱ्याचा शोध सुरू
संगमनेर LIVE (नाशिक) | भोंदू बाबा अशोक खरात यांच्याविरुद्ध नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान एक धक्कादायक आणि संतापजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरुध्द पोलिसांनी आता कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथे अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेतले असून एका फरार व्यक्तीचा शोध युध्दपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोपरगाव येथील बीएमडब्लू (BMW) नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर २५ मार्च २०२६ रोजी पीडित महिलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित करण्यात आले होते. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आणि या कृत्यामागील साखळी उघडकीस आणली. तपासात असे निष्पन्न झाले की, कोपरगाव येथील अनिल कोल्ड्रिंक्सचा चालक राहुल शिंदे याने हे व्हिडीओ प्रथम ग्रुपवर टाकले होते. अधिक चौकशीत राहुलला हे व्हिडीओ कोपरगावच्याच योगेश आढाव याने पाठविल्याचे समोर आले, तर योगेशला बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील त्याचा मित्र संदिप गर्जे याने हे व्हिडीओ पुरवल्याचे उघड झाले आहे.
या गंभीर दखल घेत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४७/२०२६ नुसार बीएनएस कलम २९४(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राहुल शिंदे आणि योगेश आढाव यांना तात्काळ ताब्यात घेतले असून तिसरा संशयित संदिप गर्जे याच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
हे संपूर्ण प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यामध्ये अनेक महिला पीडित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीडितांची ओळख, त्यांचे कुटुंब किंवा घराची माहिती उघड होऊ नये, यासाठी विशेष तपास पथक (SIT) अत्यंत गोपनीयरीत्या आणि संवेदनशीलतेने या प्रकरणाचा तपास करत आहे.
विशेष तपास प्रमुख यांनी या संदर्भात जाहीर इशारा दिला आहे की, कोणाकडेही पीडित महिलांची ओळख पटेल असे कोणतेही व्हिडीओ किंवा मजकूर असल्यास तो तात्काळ डिलीट करावा. हे व्हिडीओ कोणत्याही प्रसारमाध्यमांवर किंवा सोशल मीडिया ग्रुपवर शेअर करू नयेत. जर कोणी असे व्हिडीओ प्रसारित करताना आढळले, तर केवळ पाठवणाऱ्यावरच नाही तर संबंधित ग्रुपच्या ॲडमिनवरही कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात येईल.
दरम्यान पीडित महिलांची प्रतिष्ठा जपणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून नागरिकांनी अशा प्रवृत्तींना थारा देऊ नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.