बिबट्याचा संजय वाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला!
◻️ थोरात कुटुंबीयांकडून प्रकृतीची विचारपूस, वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील मंगळापूर परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा धोकादायक ठरला असून, मानवी वस्तीवर हल्ल्याच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयातील कर्मचारी आणि मंगळापूरचे रहिवासी संजय माधव वाळे यांच्यावर बिबट्याने त्यांच्या राहत्या घराजवळच अचानक हल्ला केला. या हल्ल्यात वाळे गंभीर जखमी झाले असून, परिसरात सध्या दहशतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे.
याबाबत माहिती अशी की, रात्री जेवणानंतर साधारण १० वाजेच्या सुमारास संजय वाळे घराबाहेर बसलेले असताना ही थरारक घटना घडली. अचानक समोर आलेल्या बिबट्याला पाहून त्यांनी प्रसंगावधान राखत त्याला दरडावून पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चवताळलेल्या बिबट्याने माघार घेण्याऐवजी पुन्हा फिरून थेट वाळे यांच्यावर झडप घातली. त्यांच्या आरडाओरड्यानंतर घरातील इतर सदस्य धावून आले, ज्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला. या झटापटीत वाळे यांच्या हाताला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या असून, मोठा रक्तस्राव झाला आहे. त्यांना तातडीने घुलेवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच संगमनेरमधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून मोठी चिंता व्यक्त करण्यात आली. लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात आणि डॉ. सुजित खिलारी यांनी तातडीने वाळे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना धीर दिला. यशोधन कार्यालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनीही रुग्णालयात धाव घेतली, तर वन विभागाच्या कर्मचारी श्रीमती कोंढार यांनीही दवाखान्यात येऊन या घटनेचा पंचनामा आणि पुढील चौकशी सुरू केली आहे.
संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा प्रश्न आता अत्यंत गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच जवळे कडलग येथील एका बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यानंतर तालुक्यातील जनक्षोभ उसळला होता. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाविरोधात मोठे आंदोलनही छेडण्यात आले होते. स्वतः बाळासाहेब थोरात यांनीही वनमंत्र्यांकडे या प्रश्नी ठोस धोरण आखण्याची मागणी वारंवार केली असून, वन विभागाने अधिक सक्रिय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी वेळोवेळी सूचित केले आहे.
मंगळापूर आणि आसपासच्या परिसरातील बिबट्याचा वावर पाहता नागरिकांनी आता प्रशासनाकडे आक्रमक मागणी केली आहे. संबंधित बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात यावेत आणि वन विभागाने रात्रीची गस्त अधिक वाढवावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास पुढील काळात अधिक तीव्र संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.