पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट!

संगमनेर Live
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट!

◻️ जनगणना, विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती आदि विषयांवर झाली सविस्तर चर्चा

संगमनेर LIVE (नवी दिल्ली) | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी संसदेतील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड करून केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा संधी दिल्याबद्दल आठवले यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. यावेळी त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधानांचा विशेष सत्कार केला. 

नामदार आठवले यांना मिळालेल्या या संधीमुळे देशभरातील आंबेडकरी जनतेत आणि बहुजन समाजात समाधानाचे वातावरण असून, महाराष्ट्रासह ठिकठिकाणी आनंद साजरा होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आठवले यांना आश्‍वस्त करताना म्हटले की, “आता आपण पुढील सहा वर्षे राज्यसभेत निर्धास्त राहा, आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही.”

​देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेवर भाष्य करताना नामदार आठवले यांनी धर्मातरित बौध्दाच्या नोंदीबाबत एक अत्यंत महत्त्वाची सूचना पंतप्रधानांना केली. दिवंगत पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या काळातील निर्णयाचा दाखला देत ते म्हणाले की, जनगणनेच्या अर्जामध्ये धर्माच्या रकान्यात ‘बौध्द’ असा स्पष्ट उल्लेख करून जातीच्या रकान्यात संबंधित व्यक्तीच्या पुर्वाश्रमीच्या अनुसूचित जातीचा अनुक्रमांक लिहिण्याची पद्धत अवलंबली पाहिजे. 

उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील महार समाजाने बौध्द धम्माची दीक्षा घेतली असल्याने, भारत सरकारच्या गॅझेटनुसार या जातीचा जो ५९ हा अनुक्रमांक आहे, तोच जातीच्या रकान्यात नोंदवला जावा. केवळ जातीचे नाव न लिहिता अधिकृत अनुक्रमांक नोंदवल्यास तांत्रिक प्रश्न सुटतील आणि समाजाला त्यांचे हक्क मिळवणे सोपे जाईल, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

​विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून नामदार आठवले यांनी ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप’च्या रकमेत वाढ करण्याची मागणीही यावेळी केली. पूर्वी या शिष्यवृत्तीमध्ये केंद्राचा वाटा केवळ १० टक्के होता, जो मोदी सरकारने वाढवून ६० टक्के केला आहे, याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. मात्र, गेल्या १५ वर्षापासून या शिष्यवृत्तीच्या मूळ रकमेत वाढ झालेली नसल्याने, वाढत्या महागाईच्या निर्देशांकाचा विचार करून अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दोन्ही संवेदनशील विषयांवर सकारात्मक विचार करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले.

​या औपचारिक चर्चेसोबतच बैठकीत हलके-फुलके प्रसंगही पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदी यांनी रामदास आठवले यांचा संसदेतील त्यांचा वावर आणि कामगिरी पाहून ‘सदाबहार’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला. पंतप्रधानांच्या या कौतुकाला उत्तर देताना आठवले यांनी आपल्या चिरपरिचित शैलीत “तुम्ही मला म्हणत आहात सदाबहार, कारण मी करतो काॅग्रेसवर प्रहार!” अशी खुमासदार शीघ्र कविता सादर केली. 

दरम्यान या काव्यमय फटकेबाजीमुळे बैठकीतील वातावरण अधिकच प्रसन्न झाले. आगामी काळात दलित, शोषित आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी केंद्र सरकारकडून ठोस पावले उचलली जातील, असा विश्‍वास या भेटीनंतर नामदार आठवले यांनी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !