संगमनेर पोलीस ठाण्यांच्या प्रश्नासह रखडलेल्या निधीसाठी अधिवेशनात लक्षवेधी
◻️ आमदार अमोल खताळ यांनी विविध मागण्याकडे ओढले सरकारचे लक्ष!
संगमनेर LIVE (मुंबई) | मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्यातील पोलीस दलाच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार अमोल खताळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच जर मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर हे चिंताजनक आहे," अशा शब्दांत त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यथा सभागृहासमोर मांडल्या.
आमदार खताळ यांनी संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या दयनीय अवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधले. अनेक वर्षांपासून ही निवासस्थाने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, तिथे राहणाऱ्या पोलीस कुटुंबीयांना जीव धोक्यात घालून राहावे लागत आहे. यासाठी तातडीने अतिरिक्त निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.
घारगाव पोलीस स्टेशन सध्या मुळा नदीलगतच्या भागात कार्यरत असून, तिथे सोयीसुविधांचा मोठा अभाव आहे. या पोलीस ठाण्याच्या नूतनीकरणासाठी शासनाने ५ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल आमदार खताळ यांनी आभार मानले, परंतु प्रत्यक्ष कामात गती आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संगमनेरमधील पोलीस ठाण्यांत पुरेसे मनुष्यबळ नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. “केवळ भरती होऊन चालणार नाही, तर स्थानिक लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रत्येक ठाण्यात पोलिसांची संख्या वाढवणे काळाची गरज आहे," असे त्यांनी नमूद केले.
राजकीय आंदोलनांदरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल होणारे गुन्हे मागे घेण्याबाबत शासनाचे आदेश असूनही, कनिष्ठ स्तरावरून प्रस्ताव पाठवण्यास विलंब होत असल्याचे खताळ यांनी सांगितले. अशा प्रकरणांची तातडीने दखल घेऊन कार्यकर्त्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.