संगमनेर तालुक्यात ‘जल जीवन’चा पुरता बट्याबोळ - आमदार अमोल खताळ
◻️ उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची आमदार खताळांची अधिवेशनात मागणी
संगमनेर LIVE (मुंबई) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘हर घर जल' या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘जल जीवन मिशन’ योजनेच्या कामांचा संगमनेर तालुक्यात अक्षरशः खेळखंडोबा झाला असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी लावून धरली.
सभागृहात आपली बाजू मांडताना आमदार खताळ यांनी सांगितले की, संगमनेर तालुक्यात या योजनेअंतर्गत झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून सरकारी निधीचा मोठा अपव्यय झाला आहे. अनेक गावांमध्ये कागदोपत्री योजना पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन करत असले, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पाइपलाइन फुटलेल्या आहेत, तर कुठे पाण्याच्या टाक्यांची कामे अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत.
या दर्जाहीन कामांमुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे सर्वसामान्य जनतेला अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही स्थानिक यंत्रणेने ठेकेदारांना पाठीशी घातल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला असून, या गलथान कारभारामुळे लोकप्रतिनिधींनाही नाहक बदनामीला सामोरे जावे लागत आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करून संगमनेर तालुक्यातील या सर्व कामांची तपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी आग्रही मागणी आमदार खताळ यांनी केली आहे. ज्यांनी या कामात हलगर्जीपणा केला किंवा भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबला, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान केंद्र सरकारचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचा असताना केवळ यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे ही योजनाच धोक्यात आली असून, गोरगरीब जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.