सहकार पंढरीत भक्ती आणि स्वरांच्या संगमात ‘मोगरा फुलला’

संगमनेर Live
0
सहकार पंढरीत भक्ती आणि स्वरांच्या संगमात ‘मोगरा फुलला’

◻️ संत ज्ञानेश्‍वरांच्या जयंती सप्तशताब्दी वर्षाच्या निमित्‍ताने सांस्कृतिक विभागाचा उपक्रम


संगमनेर LIVE (लोणी) | संपूर्ण विश्‍वाला पसायदान देणाऱ्या माऊलींच्या विचारांचा सुगंध आजही जनमानसात दरवळत आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जयंती वर्षाच्या निमित्‍ताने आयोजित ‘मोगरा फुलला’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वाना मंत्रमुग्ध केले. सहकारच्या पंढरीत झालेल्या सांगितिक कार्यक्रमातून भक्तीसंगीत आणि ज्ञानेश्‍वरीतील निरूपणाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा वारसा उलगला गेला.

राज्य सरकारचा सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचनालय यांच्या संकल्पनेतून संत ज्ञानेश्‍वरा महाराजांच्या जयंतीचे सप्तशताब्दी वर्ष सांस्कृतिक उपक्रमाने साजरे करीत आहे. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात संपन्न झालेल्या कार्यमात निरुपणकार गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारीत सर्व प्रसंगाचे वर्णन सांगून, त्यावर आधारीत अभंगाचे स्वमधूर गायन सन्मिता शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

ह.भ.प.उध्दव महाराज मंडलिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी आधिकारी शिवानंद हिरेमठ, चेअरमन नंदूशेठ राठी, कैलास तांबे, कारखान्‍याचे कार्यकारी संचालक महेश कोणापूरे, संचालक प्रदीप दिघे, संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्य महेश खर्डे, प्राचार्य राम पवार, प्राचार्य डॉ. संजय गुल्‍हाणे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपेगावच्या जन्म स्थानापासून ते आळंदी येथील समाधी स्थळावरील प्रसंगाचे भावस्पर्शी वर्णन गणेश शिंदे यांनी करून ज्ञानेश्‍वरांच्या जीवनातील विविध टप्पे रसिकांसमोर त्यांनी उलगडले. ज्ञानेश्‍वरी हा केवळ ग्रंथ नसून तो जगण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या जागतिक अशांततेच्या वातावराणात पसायदानाचे महत्व अधोरेखीत होते. त्यामुळेच पसायदानी सुरूवातच ‘आता विश्‍वात’ या शब्दाने होते याला खूप महत्व असल्याचे अभ्यासक गणेश शिंदे म्हणाले. सध्याच्या सामाजिक आणि कौटुंबिक परीस्थीतीवर नेमके भाष्य करतानाच संत ज्ञानेश्‍वरांच्या जयंतीचे ७५० वे वर्ष प्रत्येकाच्या घरापासून साजरे करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या निरूपणातून केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या गायिका सौ. सन्मिता शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग सर्वानाच मंत्रमुग्ध करून गेले. ‘अवघा रंग एक झाला’, ‘बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल’, आशी निरुपणावर आधारीत बहारदार गाणी सादर करून त्यांनी टाळ्यांची दाद आणि चैतन्य निर्माण करून गेले.

ह.भ.प.उध्दव महाराज मंडलिक यांनी आपल्या संदेशात राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने अतिशय महत्त्वपूर्ण असा उपक्रम आयोजित करून राज्याची अध्यातमिक वारकरी आणी सांस्कृतिक परंपरा जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. गणेश शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.सन्मिता शिंदे यांनी ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमाची तयार केलेली संहीता प्रेरणादायी असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !