लोणीच्या ऐश्वर्या शेवाळे यांना ‘सावित्री-ज्योती संशोधक’ पुरस्कार जाहीर
◻️ ‘ब्र’ कादंबरीवरील संशोधनात्मक निबंधाची राज्यस्तरावर दखल
संगमनेर LIVE (लोणी) | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, लोणी येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी ऐश्वर्या शेवाळे यांनी साहित्य आणि संशोधन क्षेत्रात देदीप्यमान यश संपादन केले आहे. अक्षर वाड्मय प्रकाशन, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘सावित्री-ज्योती संशोधक दत्तक योजना २०२५' मध्ये ‘आधुनिक स्त्री जीवन’ या विषयावर सादर केलेल्या शोधनिबंधास हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप अत्यंत अश्वासक असून, यामध्ये ऐश्वर्या यांना प्रगती टेक कंपनीकडून दहा हजार रुपयांपर्यंतची साहित्यिक पुस्तके भेट मिळणार आहेत. यासोबतच अक्षर वाड्मय प्रकाशनाच्या वतीने साहित्य खरेदीवर २५ टक्के सवलत आणि 'अक्षर पेरणी' या नामांकित द्विमासिकाचे आजीव सभासदत्व देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सलालकर यांनी सांगितले की, राज्यस्तरावरून प्राप्त झालेल्या एकूण ४२ शोधनिबंधांमधून ऐश्वर्या शेवाळे यांच्या संशोधनाची निवड झाली. त्यांनी प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्या ‘ब्र' या कादंबरीवर सखोल भाष्य करणारा शोधनिबंध सादर केला. या निबंधात त्यांनी स्वयंसेवी संस्थांचे राजकारण, आदिवासी युवकांचा ग्रामपंचायतीमधील सहभाग आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा संशोधनात्मक आढावा घेतला आहे.
कादंबरीतील पात्रांचा स्वभावबदल, कथानकाचा संघर्ष आणि लेखिकेची विशिष्ट शैली यावर त्यांनी प्रभावी प्रकाश टाकला आहे. याव्यतिरिक्त ‘कुरूप’ या कवितासंग्रहाद्वारे मराठी साहित्यातील पारंपरिक सौंदर्यकल्पनांना दिलेले आव्हान आणि पाश्चात्य विचारवंतांची स्त्रीविषयक भूमिका मांडणारे त्यांचे अन्य शोधनिबंधही अत्यंत अभ्यासपूर्ण ठरले आहेत.
विद्यार्थ्यामध्ये शिक्षणासोबतच साहित्याची आणि संशोधनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रोत्साहन देत असते. ऐश्वर्याने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपप्राचार्य डॉ. शांताराम चौधरी यांनी व्यक्त केले.
दरम्यान या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी ऐश्वर्या विशेष अभिनंदन केले आहे. तसेच संस्थेचे अतिरिक्त सहसचिव भारत घोगरे, डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे आणि उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार यांनीही तिच्या या यशाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.