नामदार विखे आणि आमदार खताळामुळे दिव्यांगाच्या आयुष्यात ‘इलेक्ट्रिक’ प्रकाश

संगमनेर Live
0
नामदार विखे आणि आमदार खताळामुळे दिव्यांगाच्या आयुष्यात ‘इलेक्ट्रिक’ प्रकाश

◻️ ​सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते अवघ्या ७२ तासांत तीनचाकी सायकल सुपुर्द 

​संगमनेर LIVE | माणुसकी आणि तत्पर राजकारण काय असते, याचा प्रत्यय संगमनेर शहराजवळील सुकेवाडी येथे पाहायला मिळाला. जन्मतःच दोन्ही पायाने दिव्यांग असूनही अनेक वर्षे मदतीसाठी झगडणाऱ्या बाबासाहेब काशिनाथ भवर यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून अवघ्या तीन दिवसांत इलेक्ट्रिक तीन चाकी सायकल मिळाली आहे. विशेष म्हणजे, यासाठी भवर यांनी कोणताही औपचारिक अर्ज केला नव्हता, केवळ त्यांच्या व्यथेची दखल घेऊन ही मदत करण्यात आली.

​सुकेवाडी येथील महागणपती मंदिरात वास्तव्यास असलेले बाबासाहेब भवर हे दोन्ही पायाने दिव्यांग असल्याने त्यांना दैनंदिन हालचालींसाठी प्रचंड कसरत करावी लागत होती. अनेक ठिकाणी मदतीची याचना करूनही त्यांना यश मिळत नव्हते. ही बाब महायुतीचे कार्यकर्ते तेजस गुंजाळ यांच्या लक्षात आली. त्यांनी भवर बाबांची व्यथा मांडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. हा व्हिडिओ आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या निदर्शनास आला आणि मदतीची चक्रे वेगाने फिरू लागली.

​आमदार खताळ यांनी तातडीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विळदघाट येथील कार्यालयाशी संपर्क साधला. भवर बाबांची परिस्थिती पाहता तातडीने इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून देण्याचा शब्द पालकमंत्र्यांनी दिला. सरकारी दप्तरदिरंगाईला बाजूला सारून, लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या दोन ते तीन दिवसांत ही हायटेक सायकल सुकेवाडीत दाखल झाली.

​आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात नीलम खताळ यांच्या हस्ते ही सायकल भवर बाबांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी आमदार खताळ हे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईत होते. मात्र, त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे भवर बाबांशी थेट संवाद साधला. “तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. लवकरच तुम्हाला ‘संजय गांधी निराधार योजने’तून दरमहा मानधनही सुरू करून देऊ," अशी ग्वाही त्यांनी दिली.

​सायकल मिळाल्यानंतर दिव्यांग बाबासाहेब भवर यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू होते. ते म्हणाले, “मी अनेक ठिकाणी हेलपाटे मारले, अर्ज केले, पण कुणीही दखल घेतली नाही. पण नामदार विखे पाटील आणि आमदार खताळ यांनी मी अर्ज न करताही माझ्या व्यथेची दखल घेतली. आज खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातील अंधार दूर झाला आहे.”

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !