विदर्भात रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांचा १०० किमीचा ‘पायी लाॅग मार्च’

संगमनेर Live
0
विदर्भात रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांचा १०० किमीचा ‘पायी लाॅग मार्च’


◻️ ​वनजमिनीचा अधिकार, कर्जमाफीसाठी हजारो कष्टकरी रवाना


संगमनेर LIVE (​यवतमाळ) |
विदर्भाच्या जीवघेण्या उन्हाची पर्वा न करता, आपल्या न्याय्य हक्कासाठी शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांचा एल्गार यवतमाळच्या मातीतून घुमत आहे. अखिल भारतीय किसान सभा आणि आशा कर्मचारी संघटना (सीटू) यांच्या संयुक्त विद्यमाने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी येथून सुरू झालेला १०० किलोमीटरचा पायी लाॅग मार्च आज चौथ्या दिवशी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

​या ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात १९ एप्रिल रोजी पिंपळखुटी येथून झाली. विदर्भाच्या ४२-४५ अंश सेल्सिअस तापमानात पायी प्रवास करत आंदोलकांनी पहिला मुक्काम १५ किमी अंतरावर असलेल्या सुना येथील गणेश मंदिरात केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा प्रवास सुरू करून कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारची विश्रांती घेत हे आंदोलक ढेगाले महाराज मंदिर परिसरात मुक्कामाला पोहोचले. अशा प्रकारे चार दिवसांचा खडतर प्रवास पूर्ण करत हा जनसागर आज २२ एप्रिल रोजी यवतमाळ शहरात प्रवेश करणार आहे.

​आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉम्रेड कुमार मोहरमपुरी यांनी या मोर्चाच्या मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने कित्येक वर्षापासून कसत असलेल्या वनजमिनी तातडीने शेतकऱ्यांच्या नावे करणे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यातील जाचक अटी व शर्ती रद्द करणे आणि आशा स्वयंसेविकांचे मानधन व इतर प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावणे या मागण्यांचा समावेश आहे. तसेच, शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जनविरोधी ‘स्मार्ट मीटर’ योजना तातडीने रद्द करावी आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे.

​या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य अध्यक्ष ऊमेश देशमुख आणि यवतमाळ जिल्हा नेते कुमार मोहरमपूरी यांच्यासह शंकर सिडाम, किशोर पवार, चंद्रशेखर सिडाम, ॲड. डी. बी. नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर आणि मनीष इसाळकर करत आहेत.

​विशेष म्हणजे, या लाॅग मार्चमध्ये केवळ तरुणच नव्हे तर वृध्द, स्त्रिया आणि लहान मुलेही मोठ्या जिद्दीने सहभागी झाली आहेत. चार दिवस ऊन-पावसाची तमा न बाळगता हे आंदोलक चालत असतानाही, अद्याप सरकार किंवा प्रशासनाने त्यांची कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यावर मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा किसान सभेने घेतला असून, या पार्श्‍वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !