शिर्डीत रविवारी ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा सोहळ्याचे आयोजन!

संगमनेर Live
0
शिर्डीत रविवारी ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा सोहळ्याचे आयोजन!

◻️ ​राज्यातील ३० नद्यांच्या जलकलशांचे पूजन आणि सांस्कृतिक महाकुंभ


संगमनेर LIVE (​शिर्डी) |
नर्मदेचा विलोभनीय किनारा आणि गोदावरीचा पवित्र तीर यांना भक्तीच्या धाग्याने जोडणारी ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या पावन भूमीत दाखल होत आहे.

जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवड्या’च्या निमित्ताने, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या भव्य यात्रेचे आयोजन २५ ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही यात्रा श्री क्षेत्र चौंडी आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथून मार्गस्थ होऊन मध्यप्रदेशातील श्री क्षेत्र महेश्‍वरपर्यत सुमारे ८५० कि.मी. चा प्रवास करणार आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून प्रथमच अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबवून जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा महत्त्वपूर्ण संदेश जनमानसापर्यंत पोहोचवला जात आहे.

​या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्यातील ३० प्रमुख नद्यांचे जलकलश शिर्डीत दाखल होणार असून, वारकरी व आध्यात्मिक क्षेत्रातील महंतांच्या हस्ते त्यांचे सामूहिक पूजन करण्यात येईल. अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या कारकिर्दीत जल व्यवस्थापनाला दिलेले विशेष प्राधान्य डोळ्यासमोर ठेवूनच, लोकसहभागातून जलसंवर्धनाचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा उद्देश या नियोजनामागे आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभाग क्रांतिकारी पावले उचलत असून, या यात्रेच्या माध्यमातून ‘वारसा, विचार आणि विकास’ या त्रिसूत्रीवर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. या ऐतिहासिक स्वागतासाठी शिर्डीतील क्रीडा संकुलाच्या मैदानावर एक भव्य सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला असून, शिर्डीकर नागरिक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

​श्रीक्षेत्र चौंडी येथून निघालेली जलयात्रा अहिल्यानगर, नेवासा, श्रीरामपूर आणि पुणतांबा मार्गे शिर्डीत येईल, तर त्र्यंबकेश्‍वर येथून निघालेली यात्रा संगमनेर, जोर्वे, उंबरी बाळापूर, आश्‍वी, लोणी, कोल्हार आणि राहाता मार्गे शिर्डीत दाखल होईल. ठिकठिकाणी ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यानी या जलयात्रेच्या अभूतपूर्व स्वागतासाठीची तयारी पूर्ण केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !