राजकीय मतभेद विसरून डॉ. विखे पाटलांची डॉ. आरणेंच्या निवासस्थानी भेट!

संगमनेर Live
0
राजकीय मतभेद विसरून डॉ. विखे पाटलांची डॉ. आरणेंच्या निवासस्थानी भेट!

◻️ शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्यास तयार - डॉ. कल्याणी आरणे


संगमनेर LIVE (​शिर्डी) |
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर शिर्डीच्या स्थानिक राजकारणात एक अत्यंत सकारात्मक आणि चर्चेची घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीत विरोधात उभ्या राहिलेल्या डॉ. कल्याणी आरणे यांच्या निवासस्थानी अचानक भेट देऊन सर्वानाच सुखद धक्का दिला. या भेटीमुळे शिर्डीच्या राजकारणात संवाद आणि सहकार्याचा एक नवा संदेश प्रवाहित झाला आहे.

​या भेटीदरम्यान पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “निवडणुका येतात आणि जातात, पण राजकारण हे वैयक्तिक द्वेषासाठी नसून समाजाच्या विकासासाठी असते.” निवडणुकीच्या प्रचारात डॉ. आरणे यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा जो उल्लेख केला होता, त्याचा संदर्भ देत डॉ. विखे यांनी सांगितले की, समविचारी आणि कर्तृत्ववान व्यक्तींना संघटनेच्या प्रवाहात पुन्हा एकत्र आणणे ही माझी संघटनात्मक जबाबदारी आहे.

​एका सामान्य कुटुंबातून संघर्ष करत वैद्यकीय क्षेत्रात आणि त्यानंतर राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. कल्याणी आरणे यांच्या प्रवासाचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी भरभरून कौतुक केले. समाजातील कष्टकरी घटकातून नेतृत्व पुढे येणे ही लोकशाहीची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीच्या विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी सर्वसमावेशक राजकारण गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

​डॉ. कल्याणी आरणे यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “दादा अचानक घरी आल्याने आम्हाला आश्चर्य वाटले. मात्र, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार आम्ही त्यांचे स्वागत केले.” विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या पदावर असूनही दादांनी आरणे यांच्या घरी साध्या घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांच्या या साधेपणाने आरणे कुटुंबीय प्रभावित झाले.

​ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर यामध्ये शिर्डीतील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आणि निवडणुकीदरम्यान समोर आलेल्या विकासकामांच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. शिर्डीच्या सर्वागीण विकासासाठी हे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्‍वास डॉ. आरणे यांनी व्यक्त केला.

​राजकीय भविष्याबाबत बोलताना डॉ. कल्याणी आरणे यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका मांडली. “भारतीय जनता पक्ष हा विशिष्ट विचारधारेवर आणि संस्कृतीवर चालणारा पक्ष आहे. शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास आम्ही ती नक्कीच स्वीकारू,” असे त्यांनी स्पष्ट केले. “भाजप एकच आहे,” असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी आगामी काळात विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दरम्यान, ​या ‘सदिच्छा भेटी’मुळे शिर्डीतील राजकीय कटुता संपून विकासाचे एक नवे पर्व सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !