‘एसआयआर’मध्ये आमदार अमोल खताळाचें काम उत्कृष्ट - खासदार ज्योती वाघमारे
◻️ संगमनेर येथील बैठकीत ‘घर तेथे शिवसैनिक, गाव तेथे शाखा’ संघटना बांधणीवर भर
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या विशेष आढावा बैठकीचे आयोजन आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते, त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी बोलताना खासदार वाघमारे यांनी आमदार खताळ यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार खताळ यांनी मतदारसंघात मोठा निधी खेचून आणला असून, जनसामान्यांची प्रलंबित कामे मार्गी लावल्याने जनतेत समाधानाचे वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवसेना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखत नाही, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' या धोरणानुसार काम करते. जिथे आपत्ती येते तिथे शिवसेना आणि जिथे संकट असते तिथे एकनाथ शिंदे धावून जातात, या भावनेतून पक्ष संघटना अहोरात्र काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार अमोल खताळ यांनी संघटनेतील शिस्तीबाबत कडक भूमिका मांडली. पक्षात जुन्या आणि नव्या सर्व पदाधिकाऱ्यांना योग्य तो सन्मान दिला जात असला, तरी आता ‘घर तेथे शिवसैनिक आणि गाव तेथे शिवसेना शाखा’ हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवले जाणार आहे. यापुढे केवळ सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यानाच पदांची जबाबदारी दिली जाईल. जे पदाधिकारी निष्क्रिय राहतील, त्यांना पदावरून कमी केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. पक्षात कोणतीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही आणि अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. साखर सम्राटांच्या बालेकिल्ल्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्याना ताकद देण्याची गरज असून, जुन्या-नव्या शिवसैनिकांनी एकत्रितपणे मैदानात उतरावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनीदेखील संगमनेरला शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला बनवण्यासाठी सर्वानी कटिबद्ध राहण्याचे सांगितले.
दरम्यान या बैठकीला महिला जिल्हाप्रमुख सुनीता शेळके, ज्येष्ठ नेते संतोष रोहम, सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.