मानवी जीवनात अंतर्बाह्य बदल होणे हीच खरी सफलता - अनिल महाराज पाटील

संगमनेर Live
0

मानवी जीवनात अंतर्बाह्य बदल होणे हीच खरी सफलता - अनिल महाराज पाटील

◻️ सद्गुरु नारायणगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्याचे सातवे कीर्तनपुष्प 


संगमनेर LIVE (​नेवासे) |
“परमार्थात केवळ बाह्य व्यवस्थेला महत्त्व नसून आपली अंतरीची अवस्था कशी आहे, याला अधिक महत्त्व आहे. आपला भाव शुध्द असेल तरच परमार्थाची खरी गोडी चाखता येते. मनुष्याच्या अंतरंगात होणारा बदल हीच खऱ्या अर्थाने परमार्थाची सफलता आहे,” असे अमृततुल्य मार्गदर्शन कीर्तनकार ह.भ.प. अनिल महाराज पाटील यांनी केले. 

नेवासे येथील ब्रम्हलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमात आयोजित ‘अखंड हरीनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण' सोहळ्याच्या सातव्या दिवशी कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलत होते.

​कीर्तनादरम्यान अनिल महाराज पाटील यांनी साधना, शुध्द चरित्र आणि परिवर्तनाच्या महत्त्वावर सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले की, मनुष्याकडे चातुर्य कमी असले तरी चालेल, मात्र त्याचे चरित्र शुध्द असणे अनिवार्य आहे. विज्ञान हे जगात केवळ तात्पुरते बदल घडवते, परंतु अध्यात्म माणसाच्या जीवनात कायमस्वरूपी आणि खोलवर सकारात्मक परिवर्तन घडवून आणते. 

परमेश्‍वर प्रत्येकाला जीवनात संधी देतो, मात्र त्या संधीचे सोने करणे पूर्णपणे मानवाच्या हातात असते. परमार्थात काही नवीन मिळवण्यापेक्षा स्वतःमधील नको असलेल्या वाईट गोष्टींचा त्याग करणे आणि चांगल्या विचारांचा स्वीकार करणे अधिक महत्त्वाचे असून, जेव्हा अंतःकरण पूर्णपणे निर्मळ होते, तेव्हाच चराचरात ईश्‍वराची खरी अनुभूती येते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

​याप्रसंगी महाराजांनी आश्रमातील शिस्तबध्द नियोजनाचे आणि महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. या आश्रमाविषयी आजवर केवळ ऐकून होतो, मात्र आज प्रत्यक्ष भेटीनंतर येथील चैतन्य आणि ऊर्जा पाहून मनाला उभारी मिळाली आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. कीर्तनानंतर आश्रमात विविध प्रकारची सेवा देणाऱ्या स्वयंसेवकांचा (दत्त्यांचा) विशेष सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याचे स्वागत आणि आभार महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांनी मानले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

दरम्यान, ​सप्ताहाच्या सातव्या दिवशीच्या अन्नदान सेवेमध्ये बाळासाहेब गोर्डे, रायभान काळे व एकनाथ लोखंडे यांनी संतपूजन केले. सकाळचा अल्पोपहार बाबासाहेब डौले यांच्या वतीने, तर दुपारचा महाप्रसाद सुदामराव तागड व हरिश्चंद्र मते यांच्या वतीने देण्यात आला. सायंकाळचा फराळप्रसाद स्व. बाळासाहेब विखे पाटील व स्व. सिंधुताई विखे पाटील यांच्या स्मरणार्थ ध्रुव राजेंद्र विखे व परिवाराच्या वतीने देण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !