मनाची एकाग्रता हाच नामस्मरणाचा मूळ पाया - महंत उध्दव महाराज मंडलिक
◻️ सद्गुरु नारायणगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता
नेवासे येथे ब्रम्हलीन सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित अखंड हरीनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी 'कंठी धरीला कृष्णमणी l अवघा जनी प्रकाश ll' या अभंगावर भाविकांना सुंदर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना महाराज म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाने केलेला काला हा अध्यात्माच्या पूर्णत्वाचा प्रसाद आहे. जीवनात विशेष अनुभूती, मनशांती आणि समाधान मिळवण्यासाठी साधना व सेवा करणे आवश्यक आहे. हरीकथा, नामघोष आणि नामस्मरण यातून मानवी जीवाला शांती मिळते, परंतु त्यासाठी मनाची निरंतरता असणे गरजेचे आहे. संसाराच्या तापाने थकलेल्या मानवी मनाला ग्रंथ, मठ, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांतून नवी ऊर्जा प्राप्त होते. आपण सर्व ईश्वराचेच रूप असून मायेचा अडसर दूर झाला की भगवंताची प्राप्ती सहज होते.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. शेतकरी आणि संन्यासी यांचे पुण्य सारखेच असून शेतकऱ्यालाही शेतीत कष्टाचे ‘तप’ करावे लागते, मात्र आजच्या बिकट स्थितीत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सद्गुरु आश्रमाचा हा उत्सव सर्वांच्या सहकार्याने आणि पंचक्रोशीतील भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वीपणे संपन्न झाला. तरुणांचे श्रम आणि ज्येष्ठांचे नियोजन यामुळे या सोहळ्यात कोणतेही अडथळे आले नाहीत. पुढील वर्षी सद्गुरु आश्रमाचा 'तप:पूर्ती सोहळा' साजरा होणार असून तो सर्वांच्या तन-मन-धनाच्या सहभागातून आदर्शवत करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
कीर्तनानंतर विविध क्षेत्रांतील सेवा देणाऱ्या दात्यांचा महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य, मृदूंगाचार्य आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन बाळासाहेब झिने यांनी केले.
दरम्यान, याप्रसंगी संतपूजन नामदेव शिंदे, सीताराम गारुळे, भाऊसाहेब तऱ्हाळ व कु. श्रध्दा प्रकाश आढाव यांच्या वतीने करण्यात आले, अल्पोहार किशोर राजदेव, सागर वाढेकर तर, महाप्रसादाचे नियोजन नामदेवराव शिंदे व परिवाराने केले होते.