महिला बचत गटांच्या प्रगतीला ‘ड्रोन’चे बळ - सौ. शालीनीताई विखे पाटील
◻️ शेती क्षेत्रात क्रांती: शिर्डी मतदारसंघात १३ ड्रोनचे वितरण
संगमनेर LIVE (लोणी) | महिला बचत गटांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने, शिर्डी मतदारसंघात ड्रोन तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. “ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायाला मोठी मदत होणार असून महिला बचत गट आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भरारी घेतील,” असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), अहिल्यानगर यांच्या जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत, जनसेवा फाउंडेशनच्या सहकार्याने हा विशेष रोजगार निर्मिती उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात शिर्डी मतदारसंघातील महिला बचत गटांना १३ ड्रोनचे वितरण करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ नुकताच पार पडला.
या उपक्रमाच्या माध्यमातून आधुनिक शेतीवर विशेष भर दिला जात असून, रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून शेती व्यवसाय अधिक किफायतशीर बनवणे हा मुख्य हेतू आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा नियोजन मंडळाच्या साहाय्याने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना थेट महिला बचत गटांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.
जनसेवा फाउंडेशनने या कार्यात घेतलेल्या पुढाकारामुळे आज जिल्ह्यात सुमारे ४० हजारांहून अधिक महिलांचे सक्षम जाळे निर्माण झाले आहे. या महिलांना केवळ ड्रोन चालवण्याचे तांत्रिक प्रशिक्षणच दिले जात नाही, तर उत्पादन तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, भाजीपाला प्रक्रिया आणि उत्पादित मालाच्या विक्री व्यवस्थेचेही सविस्तर प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात येत आहे. केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर प्रत्यक्ष व्यवसायासाठी विविध शासकीय योजनांतून आवश्यक आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली जात आहे.
“ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीत वेळ आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे. महिलांनी या संधीचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती उत्पादनात वाढ करावी आणि स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे.” असे आवाहन सौ. शालिनीताई विखे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी संवत्सरचे सरपंच विवेक परजणे, ‘माविम'चे तालुका प्रमुख दीपक लुटे, जनसेवा फाउंडेशनच्या प्रकल्प संचालिका सौ. रुपाली लोंढे, सुनील आहेर, वावगे ग्रीन कृषी विमान व ब्रिज टेक इंडस्ट्रीजचे निलेश गागरे, अनिकेत झांबरे, भगवान म्हसे, निता कांदळकर यांसह अनेक पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान, या तंत्रज्ञानामुळे फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार असून, मजुरीचा खर्च कमी होऊन कीटकनाशकांच्या अचूक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याचेही रक्षण होणार आहे.