आश्वी येथे भंते डॉ. ए. सुमेध बोधी यांच्या ‘धम्मरथ संदेश यात्रे’चे आगमन
◻️ चैत्यभूमीवरून निघालेला धम्मरथ कोकण मार्गे संगमनेरच्या दिशेने रवाना
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नियोजनानुसार ही झंझावाती धम्मरथ संदेश यात्रा कोकण मार्गे आश्वीच्या दिशेने रवाना झाली आहे.
आश्वी येथे २२ एप्रिलपासून बौध्दाचार्य श्रामणेर शिबीर आणि बौध्द धम्म दीक्षा सोहळा यांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात मोठे चैतन्य पसरले असून, स्थानिक नागरिकांनी भिक्खू संघाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. या यात्रेचा मुख्य उद्देश धम्मप्रसार आणि सामाजिक प्रबोधन असून, भंते डॉ. सुमेध बोधी यांच्या सुश्राव्य वाणीतून नागरिकांना धम्म मार्गदर्शन आणि दीक्षा लाभणार आहे.
या धम्मरथ संदेश यात्रेला प्रवासादरम्यान ठिकठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. यापूर्वी नाशिक शहरात भव्य मिरवणुकीने यात्रेचे स्वागत करण्यात आले, तर संगमनेर तालुक्यातील शिबलापुर, मालुंजे, डिग्रस, पिंप्री-लौकी अजमपुर या गावांमध्येही नागरिकांनी भिक्खू संघावर दानाचा वर्षाव करून आपला आदर व्यक्त केला. ही यात्रा आता आश्वी येथे दाखल होणार आहे.
भंते डॉ. सुमेध बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या मंगलमय ‘बौध्द धम्म दीक्षा सोहळ्या'चा आणि प्रबोधनाचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीचे समन्वयक अनिल मुन्तोडे यांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे आश्वी परिसरात धम्मचक्र अधिक गतिमान होऊन सामाजिक एकोप्याचा संदेश दिला जाणार आहे.