महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांची पाईप लाईन फुटली

संगमनेर Live
0
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांची पाईप लाईन फुटली

◻️ आमदार अमोल खताळांकडे ​ठेकेदारावर कारवाईची मागणी


​संगमनेर LIVE |
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने आणि मोठ्या आर्थिक गुंतवणुकीतून उभी केलेली शेतीची जीवनवाहिनी (पाईपलाईन) महावितरणच्या ठेकेदाराच्या बेजबाबदार कारभारामुळे फुटल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांना केला. तब्बल ९ ते १० किलोमीटर लांबीची ही पाईपलाईन फुटल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.

​पुणे - नाशिक बायपास महामार्गालगत खांडगाव रोडवर महावितरणच्या केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम करत असताना होलपास घेताना ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या १० केजी वजनाच्या आणि ६ इंची व्यासाच्या तब्बल ५ पाईपलाईन फोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पाईपलाईन प्रवरा नदीवरून चंदनापुरी परिसरातील शेतीसाठी पाणी आणण्यासाठी उभारण्यात आल्या होत्या.

​चंदनापुरीतील शेतकऱ्यांनी बॅकांकडून कर्ज काढून आणि घरातील दागदागिने गहाण ठेवून कोट्यवधी रुपये खर्चून ही पाईपलाईन योजना कार्यान्वित केली होती. प्रवरा नदीचे पाणी १० किलोमीटरवरून आणणे हे या शेतकऱ्यांसाठी मोठे स्वप्न होते, मात्र ठेकेदाराच्या एका चुकीमुळे या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे.

​पाईपलाईन फुटल्यानंतर शेतकऱ्यांनी दोन महिने ठेकेदाराकडे पाठपुरावा केला. त्यानंतर ठेकेदाराने दुरुस्तीसाठी पाईप दिले, मात्र ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने ही जोडणी केली, पण जशी विद्युत मोटार सुरू केली, तसे हे पाईप जागोजागी फुटू लागले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांना दुहेरी आर्थिक फटका बसला आहे.

​पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने शेतीला पाणी देणे अशक्य झाले आहे. सध्या शेतात असलेला कांदा, गहू, हरभरा आणि जनावरांचा चारा पाण्याअभावी जळून जात आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने चंदनापुरीतील शेतकरी हवालदिल झाला आहे.

​या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या चंदनापुरी परिसरातील २० ते २५ शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी संबंधित बेजबाबदार ठेकेदारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आणि झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, ठेकेदाराने दिलेले निकृष्ट पाईप बदलून त्याऐवजी 'आयएसआय' मार्क असलेले दर्जेदार जीआय पाईप उपलब्ध करून देऊन त्यांची योग्य पध्दतीने जोडणी करून द्यावी, अशी आग्रही मागणी याप्रसंगी करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !