खळी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे संशयित पोलिसांच्या ताब्यात!
◻️ संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी
रविवारी (दि. ३) सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास खळी येथील मंदिर परिसरात एक अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरताना दिसून आली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्याला त्याचे नाव, गाव आणि तिथे येण्याचे कारण विचारले असता, त्या व्यक्तीने कोणतीही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. त्याच्या संशयास्पद हालचाली आणि वागण्यामुळे नागरिकांनी त्याला तातडीने पकडून ठेवले आणि या घटनेची माहिती आश्वी पोलिसांना दिली.
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संगमनेर दौरा असल्याने पोलीसांचा लवाजमा संगमनेर येथे होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच आश्वीचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे, पोलीस हवालदार अमोल गोसावी आणि नामदेव बिरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली, मात्र त्याच्याकडे कोणत्याही आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नाहीत. प्राथमिक तपासणीत सदर व्यक्ती परप्रांतीय असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर, सोमवारी (दि. ४) या संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, सध्या आश्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाड्या-वस्त्यांवर अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याने पोलीस रात्रीच्या वेळी अत्यंत दक्षतेने गस्त घालत आहेत. या संशयित आरोपीच्या चौकशीतून चोऱ्यांच्या सत्राचे काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी देखील सतर्क राहून कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.