संगमनेर औद्योगिक वसाहतीला १० कोटींच्या निधीसाठी मंत्री उदय सामंत सकारात्मक

संगमनेर Live
0
संगमनेर औद्योगिक वसाहतीला १० कोटींच्या निधीसाठी मंत्री उदय सामंत सकारात्मक

◻️​ आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश; रखडलेल्या पायाभूत सुविधांना मिळणार गती

​संगमनेर LIVE | वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी आता १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या मागणीची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, या प्रस्तावाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याचे सकारात्मक आश्‍वासन दिले आहे.

​महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ७ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी संगमनेर मतदारसंघातील औद्योगिक विकास आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

​आमदार अमोल खताळ यांनी यावेळी औद्योगिक वसाहतीची दुरवस्था उद्योग मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. वसाहतीमध्ये अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. तसेच, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनाकडेही दुर्लक्ष झाल्याने उद्योजक आणि कामगारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे खताळ यांनी सांगितले. विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या संचालक मंडळाने याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपकाही त्यांनी यावेळी ठेवला.

​संगमनेर औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, या निधीतून प्रामुख्याने अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे आणि सुरक्षा व्यवस्थेची कामे पूर्ण केली जाणार आहेत. या प्रस्तावाला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही उद्योग मंत्र्यांनी दिली आहे. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी उद्योग केंद्र, अहिल्यानगर यांनी हा प्रस्ताव एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयाकडे सादर केला होता. या नियोजित कामांमुळे संगमनेरला आधुनिक आणि सुसज्ज रोजगारनिर्मितीचे एक नवे केंद्र बनवणे आता शक्य होणार आहे.

​“सहकारी औद्योगिक वसाहतीचा विकास हा संगमनेरच्या आर्थिक प्रगतीचा पाया आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामांना मंजुरी मिळाल्यास, ही वसाहत आधुनिकतेकडे वाटचाल करेल आणि सुरक्षित वातावरणात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.” असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !