रामपुर येथे वारकरी संस्कारांच्या बालसंस्कार शिबिराचा शुभारंभ!
◻️ संत कृपा वारकरी शिक्षण संस्थेकडून ११ दिवस भक्तीचा जागर
संगमनेर LIVE (सात्रळ) | राहुरी तालुक्यातील रामपूर येथे संत कृपा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित मुला-मुलींच्या भव्य बालसंस्कार शिबिराचा नुकताच उत्साहात प्रारंभ झाला. ग्रामीण भागातील मुलांमध्ये अध्यात्मिक ओढ निर्माण व्हावी आणि त्यांच्यावर लहान वयातच वारकरी संप्रदायाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची माहिती ह.भ.प. शितलताई साबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली असून, १० मे पासून या ज्ञानयज्ञाला सुरुवात झाली आहे.
या शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्याना वारकरी परंपरेतील विविध विषयांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये श्रीमद् भगवद्गीता, हरिपाठ, हनुमान चालीसा आणि विविध श्लोकांचे पाठांतर करून घेतले जाईल. केवळ पाठांतरच नव्हे, तर गायन, पखवाज आणि तबला वादन यांसारख्या संगीत कलेची साधना करण्याची संधीही मुलांना मिळणार आहे. यासोबतच ज्ञानेश्वरीतील निवडक वेचे, अभंग आणि थोर संत चरित्रांचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्याचा वैचारिक पाया भक्कम केला जाणार आहे.
विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी वारकरी संप्रदायातील अनेक नामवंत कीर्तनकार व प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये शुभम महाराज पानगव्हाणे, अण्णा महाराज लोंढे, राजाराम महाराज साठे, रूपाली महाराज गवळी, एकनाथ महाराज निकम आणि ह.भ.प. शितलताई साबळे यांच्या अनुभवाचा शिबिरार्थीना लाभ मिळणार आहे. बालवयातच मुलांच्या मनावर योग्य संस्कार झाल्यास भविष्यात एक सुसंस्कृत पिढी निर्माण होईल आणि वारकरी संप्रदायाचा अध्यात्मिक ध्वज पुढील पिढीच्या मनात फडकवला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हे शिबिर गुरुवार, दिनांक २१ मे पर्यत चालणार असून याच दिवशी शिबिराची मोठ्या उत्साहात सांगता होईल. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याच्या राहण्याची व भोजनाची चोख व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आली आहे. या धार्मिक उपक्रमात परिसरातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना सहभागी करावे, असे आवाहन संत कृपा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.