खरशिंदे येथे ६५ वर्षीय आजींने बिबट्याला दिवसा घरात कोंडले!
◻️ महिलेच्या समयसूचकतेमुळे टळला अनर्थ, वनविभागाकडून बिबट्या जेरबंद
संगमनेर LIVE | समोर साक्षात मृत्यू उभा असतानाही डगमगून न जाता, एका ६५ वर्षीय महिलेने दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावात गुरुवारी (दि. १४) सकाळी बिबट्या थेट घरात घरात घुसल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, गंगुबाई गायकवाड यांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले.
गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास खरशिंदे येथील हरिभाऊ शिवराम गायकवाड यांच्या घरात बिबट्याने प्रवेश केला. यावेळी हरिभाऊंची आई गंगुबाई (वय - ६५) घराच्या दरवाजाजवळ असलेल्या चुलीवर स्वयंपाक करत होत्या. अवघ्या दोन फुटांच्या अंतरावरून बिबट्या थेट घरात शिरला. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी बिबट्या शिरला, तिथेच हरिभाऊ गाढ झोपलेले होते.
समोर बिबट्याला पाहिल्यावर क्षणभर भीती वाटली, तरीही गंगुबाईनी प्रसंगावधान राखले. त्यांनी आरडाओरडा करत झोपलेल्या हरिभाऊंना बिछान्यासकट बाहेर ओढले आणि अत्यंत शिताफीने घराचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. यामुळे बिबट्या घरातच कोंडला गेला. त्यांच्या या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये वन मंडल अधिकारी भाऊसाहेब बोकडे, वनरक्षक रामेश्वर मडपे, रेस्क्यु टीम प्रमुख संतोष पारखे, श्री. पवार, श्री. धानापुणे, श्री. साळवे तसेच कर्मचारी पोपट गागरे, नजीर शेख, उत्तम भूसारी, गोविंद भूसारी, संजय गागरे, रामदास वर्पे इतरांचा समावेश होता. रेस्क्यु टीमने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम आखली असता, घरात कैद झालेला बिबट्या अत्यंत आक्रमक होऊन इकडून तिकडे उड्या मारत होता. अखेर अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर गुंगीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला सुरक्षितपणे बेशुध्द करण्यात आले.
हा सर्व थरार सुरू असताना गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकाला मोलाचे सहकार्य केले. यामध्ये संजय गायकवाड, निलेश वाडेकर, मोशीन शेख, रामनाथ वाडेकर, शिवा पंडित, जब्बर शेख, दत्ता पवार, दीपक कोळशे, शाहरुख सय्यद, लहानु पंडित, संजय पंडित, गोरख जगधने, पिर मोहम्मद शेख, संजय भुसारी आणि सोनू पंडित या सर्वानी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
बिबट्या जेरबंद झाल्याने खरशिंदे गावासह संपूर्ण पठार भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दरम्यान, ६५ वर्षीय गंगुबाईच्या धैर्याचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत असून "जर आजीनी दरवाजा लावला नसता, तर आज मोठी दुर्घटना घडली असती. त्यांच्या धैर्याला आमचा सलाम!” अशी चर्चा पंचक्रोशीत दिवसभर सुरू होती.