शिर्डीत संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या खासगी संकुलाचे २३ मे रोजी लोकार्पण!

संगमनेर Live
0
शिर्डीत संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या खासगी संकुलाचे २३ मे रोजी लोकार्पण!

◻️ ​संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

संगमनेर LIVE (​शिर्डी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत' आणि ‘मेक इन इंडिया’ या दूरदर्शी संकल्पनांना चालना देण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा आता जागतिक संरक्षण नकाशावर ठळकपणे उमटणार आहे. 

शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये ‘निबे ग्रुप'च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या, भारतातील खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असलेल्या या ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे उध्दघाटन येत्या २३ मे २०२६ रोजी होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि निबे ग्रुपचे गणेश निबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सोहळ्याला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

​या प्रकल्पाबाबत माहिती देताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, “शिर्डी ही पावन भूमी असून येथे आता भक्तीसोबतच ‘शक्ती’चा संगम पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ३ हजार रोजगार निर्माण होतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल. अत्यावश्यक संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांसाठी प्रगत उत्पादन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे डिफेन्स क्लस्टर निर्माण झाले असून, अहिल्यानगर जिल्हा आता संरक्षण उत्पादनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत आहे."

​निबे उद्योग समूहाचे गणेश निबे यांनी प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक बाबींवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून मिळालेल्या संधीचे सोने करत निबे ग्रुपने आतापर्यत या प्रकल्पात १००० कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक केली असून भविष्यात यात अधिक वाढ होणार आहे. 

अत्याधुनिक प्रणालींचे डिझाईन, विकास आणि उत्पादन करणारा हा भारतातील आघाडीचा समूह असून, या सोहळ्यात संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते ‘बॉम्ब शेल' प्रकल्पाचे उध्दघाटन आणि ‘बायो सीएनजी' प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि लघु-सूक्ष्म उद्योगांचे सक्षमीकरण या एकात्मिक दृष्टिकोनातून कार्यान्वित करण्यात आला आहे.

​या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने केवळ उद्योजकच नव्हे, तर देशभरातील विद्यार्थी आणि उदयोन्मुख अभियंत्यांनाही विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. यामागील मुख्य उद्देश म्हणजे संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि संधींची ओळख तरुण पिढीला व्हावी, हा आहे. पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी ओळखून येथे बायो सीएनजी सारखे प्रकल्पही राबवले जात आहेत, जे उद्योगाच्या शाश्‍वत विकासाचे प्रतीक आहेत. हा डिफेन्स क्लस्टर भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेला बळकट करणारा एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्‍वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !