मान्सून पूर्व पावसाने घेतले संगमनेर तालुक्यात दोन बळी
◻️ लोहारे आणि डिग्रसमध्ये शोककळा; शेतीपिकांसह मालमत्तेचे अतोनात नुकसान
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात बुधवारी झालेल्या भीषण मान्सूनपूर्व पावसाने आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. निसर्गाच्या या प्रकोपात तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये एका ४२ वर्षीय महिलेचा आणि एका ६५ वर्षीय वृध्दाचां मृत्यू झाला. मान्सून पूर्व पावसाने तालुक्यात दोन बळी घेतल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
बुधवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने तालुक्याला झोडपून काढले. लोहारे येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरीकडे डिग्रस येथे घराची भिंत अंगावर कोसळल्याने एका वृध्दाने आपला प्राण गमावला. या नैसर्गिक आपत्तीमुळे केवळ जीवितहानीच झाली नाही, तर अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने मालमत्तेचेही अतोनात नुकसान झाले आहे.
लोहारे येथे कामानिमित्त रनमाळे यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या लताबाई कैलास सोनवणे (वय - ४२) यांच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने, काढलेला कांदा भिजून नुकसान होऊ नये म्हणून लताबाई आपल्या पतीसह शेतात तो झाकण्यासाठी गेल्या होत्या. याच दरम्यान काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि वीज कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. कष्टाळू महिलेच्या अपघाती निधनाने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुसरी हृदयद्रावक घटना डिग्रस येथे घडली. महादू दगडू माळी (अंदाजे वय - ६५) हे वादळी पाऊस सुरू झाल्याने सुरक्षिततेसाठी घरात थांबले होते. कुटुंबातील इतर सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेल्याने ते घरी एकटेच होते. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, घराची भिंत कोसळून महादू माळी त्याखाली गाडले गेले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत घुलेवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे हजारवाडी, प्रतापपूर, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, शेडगाव, पिप्री-लौकी अजमपूर यासह अनेक गावात देखील घराची पडछड झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तर, अनेक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बळीराजा हवालदिल झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पीडित कुटुंबांना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी आणि नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.