शिर्डी बनणार देशाचे नवे डिफेन्स हब - पालकमंत्री विखे पाटील
◻️ रॉकेट लॉन्चर, स्वयंचलित ड्रोन निर्मिती; शनिवारी संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
संगमनेर LIVE (शिर्डी) | सुमारे ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या पाच हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाची उभारणी २०० एकर क्षेत्रावर करण्यात आली असून, प्रतिवर्षी सुमारे ५ लाख तोफगोळ्यांचे उत्पादन अहिल्यानगरमध्ये होणार आहे.
तोफगोळ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा खाजगी क्षेत्रातील पहिला प्रकल्प शिर्डी येथे उभारला गेला असून, त्याचे लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व ग्लोब फोर्ज लिमिटेडचे चेअरमन रविकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चेअरमन रविकांत म्हणाले की, या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार आहे. खाजगी क्षेत्रातील तोफगोळा उत्पादनाची सर्वात मोठी क्षमता असलेला हा उद्योग समूह असून, संपूर्ण उत्पादनात स्वदेशी तंत्रज्ञान आणि कच्च्या मालाचा वापर करण्यात येणार आहे. अवघ्या एक वर्षात हा प्रकल्प उभारण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत', ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेतून तो उभारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
दिनांक २३ मे २०२६ रोजी उध्दघाटन होत असलेल्या या प्रकल्पामध्ये सीएनजी प्लांटची निर्मितीही करण्यात आली आहे. येथे रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, आतापर्यंत ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली आहे.
या माध्यमातून २ हजार नागरिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. भविष्यात शिर्डीमध्ये तयार होणाऱ्या आर्टिलरी शेलमध्ये दारूगोळा भरण्याचे उत्पादनही अहिल्यानगरमध्येच सुरू करण्याचा विचार असून, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील उपलब्ध होणाऱ्या जागेवर हा प्रकल्प कार्यान्वित होईल. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची गुंतवणूक ही ३ हजार कोटी रुपयांपर्यत जाईल आणि रोजगारही पाच हजारांपर्यंत निर्माण होईल, असे रविकांत म्हणाले.
पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे. रणगाडा प्रशिक्षण क्षेत्र, के. के. रेंज आणि मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. शिर्डी येथील प्रकल्पामुळे जिल्ह्याची ओळख संरक्षण उत्पादन क्षेत्रातील जिल्हा म्हणून होईल, याचा अभिमान वाटतो. यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल.
यासाठी रतन टाटा ट्रस्टच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष ‘इनोव्हेशन सेंटर’ सुरू करण्यात येत आहे. यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, उद्योग विभागाकडून ५० कोटी रुपयांचा निधीही मंजुर झाला आहे. तसेच राहाता येथील प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतरही शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
उध्दघाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. जिल्हाभरातील नागरिकांनी आणि युवकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन, संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घ्याव्यात, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
“महसूल मंत्री असताना शेती महामंडळाची जमीन औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे सहकार्य लाभले. संरक्षण उत्पादनाचा प्रकल्प जिल्ह्यामध्ये व्हावा म्हणून, मुख्यमंत्र्यांचा पुढाकार विशेषत्वाने राहिला. जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी असून, भविष्यात श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथेही असाच प्रकल्प उभारण्यात येणार आहे,” असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.